यवतमाळ :- नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणाईला स्थानिक तसेच इतर विभागातील नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने आणि उद्योगसमुहांच्या माध्यमातुन चांगल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय अमरावती तर्फे येत्या 1 मार्चला यवतमाळ येथील लोकनायक बापूजी अणे महाविद्यालयात पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
अमरावती विभागातील युवक युवतींना नोकरीच्या संधी मिळवुन देण्याच्या उद्देशाने रोजगार मेळाव्याचे आयोजन होत असतात. त्यांचाच भाग म्हणजे “निवड जागेवरच” On spot selection मोहीम रोजगार मेळाव्यामध्ये राबविण्यात येणार आहे. त्यात विविध उद्योजकांना आवश्यक असणा-या वेगवेगळ्या पात्रतेच्या पदाकरीता कंपन्याचे प्रतिनिधि प्रत्यक्ष उपस्थित राहुन उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील व मुलाखत देऊन पात्र ठरणा-या उमेदवारांना लगेचच नोकरीची संधी दिल्या जाईल.
या मेळाव्यामध्ये गरजु विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविण्याकरीता https://tb.gy/eshvai या लिंकवर जाऊन निशुल्क आँनलाईन नोंदणी करावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जावून आपली नोदंणी करावी.
रोजगार मेळाव्यात इच्छुक उमेदवारांनी सहभाग नोंदविण्यासाठी दि. 1 मार्च रोजी लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय यवतमाळ जि.यवतमाळ येथे स्वखर्चाने बायोडाटा, पासपोर्ट फोटो, व आवश्यक कागदपत्रासह प्रत्यक्ष उपस्थित रहावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे उपायुक्त द.ल. ठाकरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.