मुंबई :- भारतीय संस्कृती चिरपुरतान – नित्यनूतन असून युरोपमधील पुनर्जागरणाप्रमाणे (Renaissance) आज भारतीय पुनर्जागरण होत आहे. अश्यावेळी भारतीय संस्कृती व सभ्यतेचा प्रचार प्रसार कसा होईल या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे, असे सांगताना काशी व अयोध्येच्या पुनरुत्थाना प्रमाणेच राज्यात देखील पंचवटी – त्र्यंबकेश्वर कॉरिडॉर विकसित व्हावा, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. केंद्रीय शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांच्या सूचनेनुसार केंद्रीय संस्कृत विद्यापीठ नवी दिल्ली तर्फे आयोजित ‘भारतीय बौद्धिक संपदा व सांस्कृतिक वारस्याचे नवे आयाम’ या विषयावरील ‘विकास यात्रा’ या एक दिवसीय चर्चासत्राचे उदघाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. २२) गिरगाव चौपाटी मुंबई येथील भारतीय विद्या भवनाच्या सभागृहात संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. भारतीय विद्या भवनच्या मुंबादेवी आदर्श संस्कृत महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित या चर्चासत्राच्या उदघाटनाला केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. श्रीनिवास वरखेडी, श्री करपात्री धाम वाराणशीचे पीठाधीश स्वामी अभिषेक ब्रह्मचारी, युवा चेतनाचे राष्ट्रीय संयोजक रोहित कुमार सिंह, भवनच्या संस्कृत अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. गिरीश जानी, प्रभारी प्राचार्य डॉ. गणपती हेगडे, विद्यार्थी व प्रतिनिधी उपस्थित होते.आजकाल आपण केवळ रस्ते, शाळा, इस्पितळ व वीज पुरवठा याला विकास मानतो. परंतु भौतिक प्रगतीच्या पुढे जाऊन मन, बुद्धी व आत्म्याचा विकास होणे ही विकासाची परिभाषा आहे असे राज्यपालांनी सांगितले. पारतंत्र्यात अनेक वर्षे गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, राणाप्रताप आदी अनेक थोर महापुरुषांच्या प्रयत्नामुळे भारत आज पुन्हा एकदा जगात स्वाभिमानाने उभा आहे. जगातील लोकांना भारत जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मातृभाषा, संस्कृती व संस्कार जपले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी चर्चासत्राच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. सुरुवातीला भवनच्या संगीत नर्तन शिक्षा पीठ येथील विद्यार्थ्यांना मंगलाचरण व कुलगीत सादर केले.