– पतीच्या पार्थिवावर अन्त्यसंस्कारासाठी आर्थिक चणचण
-ठाणेदाराने केली दोन हजार रुपयाची मदत
– गंगाबाई घाटावर अन्त्यसंस्कार
-संघमित्रा एक्सप्रेसमधील मृत्यू प्रकरण
नागपूर :-जिवंतपणी तर आर्थिक चणचण सोसावी लागली. मृत्युनंतरही गरीबीच्या वेदनेने त्याचा पिच्छा सोडला नाही. आर्थिक स्थिती तर सुधारलीच नाही उलट त्याचा जीव गेला. पतिच्या पार्थिवावर अन्त्यसंस्कार करण्यासाठी तिच्याजवळ पैसे नव्हते. स्थानिक पोलिस ठाण्याचे ठाणेदाराने तिला दोन हजार रुपयाची मदत केली. रविवारी सकाळी पतीच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अन्त्यसंस्कार करण्यात आला. बसंतीदेवी पतिच्या अस्थि घेवून गावी निघाली.
रामसेवक भुईया, रा. औरंगाबाद ( बिहार) असे मृत मजुराचे नाव आहे. त्याला पत्नी, पाच मुले आहेत. मुलांचे पालन पोषण करण्यासाठी पत्नी बसंतीदेवी शेत मजुरी करते. रामसेवकला गावात काहीच कामधंदा नसल्याने तो कामाच्या शोधात चेन्नईला गेला होता. तिथे तो मजुरी करायचा. दरम्यान त्याला मुलांची आठवण झाली आणि तो 12295 बेगळुरू दानापूर संघमित्रा एक्सप्रेसने गावी निघाला. दरम्यान काळ बनून आलेल्या यमदुताने त्याच्यावर झडप घेतली. रामसेवकचा रेल्वेच्या शौचालयात मृत्यू झाला. गुरूवार 18 मे रोजी सकाळी 8.50 वाजेच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर ही दुर्देवी घटना घडली.
माहिती मिळताच पत्नी, जावू, भाचा आणि एक शेजारी असे पाच लोक नागपुरात आले. अतिशय गरीब असल्याने स्थानिक ठाणेदाराने त्यांना दोन हजाराची आर्थिक मदत केली. रविवारी सकाळी शवदाहिनीव्दारे रामसेवकच्या पार्थिवावर अंन्त्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी हेड कॉन्स्टेबल निलेश बारड उपस्थित होते. आर्थिक चणचणीमुळे अखेरच्याक्षणी मुले उपस्थित राहू शकले नाही. निदान बापाच्या अस्थिचे दर्शन घेता येईल. यासाठी पत्नी बसंती देवी पतीच्या अस्थि घेवून बिहारला रवाना झाली. तत्पूर्वी लोहमार्ग पोलिसांनी त्यांची आस्थेने विचारपूर केली. त्यांच्या दु खात सहभागी झाले. त्यांना जेवनही दिले.
संतोषने दिली नि शुल्क सेवा
मेयो रूग्णालयातील शवविच्छेदन झालेल्या पार्थिवाला नियोजित स्थळी पोहोचविण्याचे काम करतो. मृतक रामसेवक अतिशय गरीब होता. ते अंन्त्यसंस्काराचा खर्चही उचलू शकत नव्हते. त्यामुळे सुरूवाती पासून तर शेवटपर्यंत शववाहिकेव्दारे नि शुल्क सेवा दिली, असे शववाहिका चालक संतोष महानंदीया यांनी सांगितले.
अशी पटविली ओळख
रेल्वे डॉक्टरांनी तपासून रामसेवकला मृत घोषित केले. लोहमार्ग ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल निलेश बारड यांनी घटनास्थळी पंचनामा केला असता मृतका जवळ रेल्वे तिकीट, आधार कार्ड आणि काही मोबाईल नंबर मिळाले. त्यावरून पोलिसांची मृतकाची ओळख पटविली.
@ फाईल फोटो