जर त्यांनी यातून काही धडा घेतला नाही तर पुढचा कार्यक्रम आपण एकत्र बसून करू आणि त्यांना उलथवून कसे टाकायचे याचा विचार करू  – शरद पवार

महापुरुषांच्या विरोधात टिंगलटवाळी राज्यपालाकडून केली जात असेल तर राज्यपालांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही…

या राज्यकर्त्यांमध्ये एक स्पर्धा सुरु असून ही स्पर्धा कर्तृत्वाची किंवा राज्याच्या विकासाची नाही तर महाराष्ट्राच्या बदनामीची…

महाविकास आघाडीच्या महामोर्चाने सरकारच्या उरात धडकी…महाराष्ट्रप्रेमींच्या विराट गर्दीने मोडला उच्चांक…

मुंबई  – आपली विचारधारा वेगळी असली तरी महाराष्ट्राच्या भल्यासाठी… सन्मानासाठी… स्वाभिमानासाठी… एवढ्या हजारोंच्या संख्येने… संयमाने आणि शिस्तीने सर्व आलात. यातून चुकीच्या प्रवृत्तीला काही धडा मिळेल, जर त्यांनी यातून काही धडा घेतला नाही तर पुढचा कार्यक्रम आपण एकत्र बसून करू आणि त्यांना उलथवून कसे टाकायचे याचा विचार करू असे थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी सरकारला दिले.

महाविकास आघाडीचा महाराष्ट्रद्रोह्यांच्या विरोधात आज भव्य महामोर्चा पार पडला. या महामोर्चात शरद पवार यांनी राज्यपालांसह सत्ताधार्‍यांना थेट इशाराही दिला.

आजचा हा मोर्चा एका वेगळ्या स्थितीचे दर्शन ठरत आहे. मला आठवतय ७० वर्षापूर्वी संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर या मुंबई नगरीमध्ये लाखोंचे मोर्चे निघाले. मराठी भाषिकांचे राज्य व्हावे  यासाठी हौतात्म्य पत्करायला अनेक तरुण पुढे आले त्यांनी कसला विचार केला नाही. महाराष्ट्राचा विचार केला आणि शेवटी महाराष्ट्र मिळाला. पण तरीही आज मराठी भाषिक महाराष्ट्राबाहेर आहेत. ते महाराष्ट्रात येण्यासाठी आग्रह करत आहेत त्यामध्ये बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर व अन्य भागातील असतील त्या सर्वांचा महाराष्ट्रात समावेश व्हावा यासाठी जी त्यांची भावना आहे त्या भावनांशी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील मराठी माणूस हा अंतःकरणापासून सहभागी आहे असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने आपण का जमलो ही तरुणांची शक्ती एकत्र का आली त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे महाराष्ट्राचा सन्मानासाठी… आज त्यावरच हल्ले होऊ लागले आहेत. ज्यांच्या हातात राज्याची सूत्रे आहेत ते सत्तेत बसलेले लोक महाराष्ट्राच्या युगपुरुषांबद्दल एक वेगळ्या प्रकारची भाषा वापरतात. संपूर्ण भारताला एक आत्मविश्वास देण्याचे ऐतिहासिक काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. या देशात अनेक राजे होऊन गेले. अनेकांची संस्थाने झाली पण साडेतीनशे वर्षे झाली तरी सामान्य माणसाच्या अंतःकरणात एक नाव अखंड आहे ते हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अनुल्लेख राज्याचा एक मंत्री करतो. व सत्ताधारी पक्षाचे घटक करतात. हे कदापि महाराष्ट्र सहन
करणार नाही. आणि ती तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी आज लाखोंच्या संख्येने उपस्थित राहिलात आज ज्या विश्वासाने तुम्ही आलात त्या विश्वासाची नोंद राज्यकर्त्यांनी घेतली नाही तर लोकशाहीच्या मार्गाने त्यांना तुम्ही धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही अशी खात्री शरद पवार यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राची काही वैशिष्ट्ये आहेत, सन्मानचिन्ह आहेत. महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, ही आमची सगळी सन्मानाची, आदराची स्थाने आहेत. आजचे राज्यकर्ते त्यांच्याबद्दल बोलतात. महाराष्ट्राच्या इतिहासात असा राज्यपाल मी कधी पाहिला नाही. मी स्वतः महाराष्ट्राच्या विधानसभेत जाऊन मला ५५ वर्षे झाली या कालावधीत अनेक राज्यपाल पाहिले. शंकरदयाल शर्मा असो यांच्यासह अनेकांची नावे सांगता येतील. महाराष्ट्राचे नावलौकिक वाढवण्याचे काम या लोकांनी केले. पण यावेळेला एका व्यक्तीला आणले आहे ती व्यक्ती महाराष्ट्राच्या विचारधारेला संकटात आणत आहेत. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बोलतात त्यांना शरम वाटली पाहिजे. महात्मा फुले यांनी सामान्य माणसाला संघटीत करण्यासाठी आधुनिक विचार देण्यासाठी, शेतीमध्ये बदल आणण्यासाठी, स्त्री शिक्षणाला पुढाकार देण्यासाठी महात्मा फुलेंचे नाव घेता येईल. मी बिहार, उत्तरप्रदेश दक्षिण भारतात जातो तिथे महात्मा फुले यांचे नाव आदराने घेतले जाते.ज्ञानदानाच्या क्षेत्रात मोठे काम केले त्याव्यक्तीच्या विरोधात टिंगलटवाळी राज्यपालाकडून केली जात असेल तर राज्यपालांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही असे शरद पवार यांनी ठणकावून सांगितले.

या मोर्चाच्या माध्यमातून केंद्रसरकारला लोकशाहीच्या मार्गाने संदेश द्यायचा आहे की राज्यपालांची हाकलपट्टी लवकरात लवकर करा. आज महाराष्ट्रातील लोकं शांतप्रिय आहेत, जर यांची हकालपट्टी वेळेत केली नाही तर महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही शरद पवार यांनी दिला.

या राज्यकर्त्यांमध्ये एक स्पर्धा सुरु झाली आहे. ही स्पर्धा कर्तृत्वाची किंवा राज्याच्या विकासाची नाही तर महाराष्ट्राच्या बदनामीची आहे. कोणी मंत्री शिक्षण संस्था काढण्यासाठी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागितली असे वक्तव्य करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्यात शिक्षणाची दालने नव्हती त्यावेळी औरंगाबाद येथे मराठवाड्याला शिक्षणाचे दालन उभे करण्याचे फार मोठे काम केले. महात्मा फुले यांनी पुण्याच्या भिडे वाड्यात शाळा सुरु केली. सावित्री बाईंना पुढे करून शिक्षणाची दालने खुली केली. कर्मवीर भाऊराव पाटलांनी संबंध आयुष्य ज्ञानदानासाठी घालवले. कर्मवीरांनी ज्यांच्या घरी अन्न नव्हते ते उभे करण्यासाठी खबरदारी घेतली पण कधीही लाचारी स्विकारली नाही. गरीब मुलामुलींसाठी वसतिगृह काढली व हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. आज अशा व्यक्तींसंबंधीचा उल्लेख करताना कोणी गलिच्छ शब्द वापरत असतील तर अशा लोकांना धडा शिकवण्याचे काम आपल्याला करावे लागेल असेही शरद पवार म्हणाले.

स्वाभिमान आणि अस्मितेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठतो व आपले ध्येय साध्य केल्याशिवाय शांत बसत नाही याची साक्ष देणारा हा महामोर्चा – अजित पवार

गेले सहा महिने राज्यात जे सरकार सत्तेत आले त्यामुळे दुर्दैवाने राज्याच्या मातीला फुटीचा, गद्दारीचा डाग लागला आहे. महाराष्ट्रावर जेव्हा संकट येते तेव्हा राज्याचा स्वाभिमान आणि अस्मितेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठतो आणि आपले ध्येय साध्य केल्याशिवाय शांत बसत नाही याची साक्ष देणारा हा महामोर्चा असल्याचे उद्गार विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काढले.

महापुरुषांचा सन्मान… महाराष्ट्राचा अभिमान… महाराष्ट्रवासियांचा स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी आपल्या राज्यातील महाराष्ट्रद्रोह्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी हा हल्लाबोल महामोर्चा आयोजित केला असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.

महापुरुषांविषयी अपमानास्पद वक्तव्य सातत्याने होत आहेत त्याला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढावा लागला अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, मौलाना आझाद अशा अनेक महापुरूषांची नावांची यादी आहे. ज्यांच्याबद्दल गरळ ओकण्याचे काम, बेताल वक्तव्य करण्याचे काम कशामुळे सुरू आहे, यामागील मास्टमाईंड कोण आहे, हे का थांबत नाही, असे अनेक सवालही अजित पवार यांनी राज्यसरकारला केले.

माणसाकडून चूक एकदा होऊ शकते, चूक झाल्यास माफी मागतो ही राज्याची संस्कृती आहे परंतु सत्ताधाऱ्यांमध्ये तसे घडत नाही. राज्यपाल काही बोलले की, त्यांच्यापुढे त्यांचे मंत्री बेताल वक्तव्य करतात, अशा लोकांना जनाची नाही तर मनाची लाज वाटायला हवी, असे शब्दात अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध केला.

तुम्ही राज्यकर्ते म्हणून बसले असताना संविधान, कायदा काय सांगतो हे पाहणे जरूरीचे असताना या सगळ्याचा विसर राज्यकर्त्यांना पडला आहे, असा आरोपही अजित पवार यांनी यावेळी केला. या सर्व विरोधात जितक्या मोठ्या संख्येने राज्यातील जनसमुदाय इथे अवतरला आहे त्यातून राज्यकर्त्यांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.

यावेळी महापुरुषांचा होणार अपमान पहाता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवले पाहिजे, या सोबत जे आमदार दोषी असतील त्यांनाही हटवले पाहिजे अशी मागणी अजित पवार यांनी केली.

या सर्व प्रवृत्तीची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी उद्याच्या अधिवेशनात वेळ पडल्यास कडक कायदा करावा अशी मागणी करतानाच अशाप्रकारच्या बिलाला आमचा पूर्णपणे पाठिंबा राहील असेही अजित पवार म्हणाले.

बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमाभागातील ८६५ मराठी गावे राज्यात आणण्याचा संघर्ष सुरू असताना राज्यातील गावे कर्नाटकात जाण्यास का सुरुवात झाली याचा राज्यातील नागरिकांनी विचार करायला हवा. आम्ही सत्तेत असताना अशा पद्धतीने कधीही भूमिका सीमाभागातील गावांनी घेतली नाही. देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र पूर्णपणे वेगळा आहे त्यामुळे हे का घडले आणि कुणामुळे घडले याची स्पष्टता व्हायला हवी असेही अजित पवार ते म्हणाले.

शिंदे-फडणवीस सरकार कर्नाटक बँकेत सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याची भूमिका घेतात यावर अजित पवार यांनी राज्यसरकारला धारेवर धरले. कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राबद्दल अनेक वक्तव्ये केली त्यावर राज्यसरकारला काही वाटायला हवे, कर्नाटक सरकार सातत्याने आपल्यावर अन्याय करतेय. तुमचे पुतणा मावशीचे प्रेम हे सगळ्यांना कळाले आहे, अशी टीकाही अजित पवार यांनी केली.

आपल्याला इथेच थांबून चालणार नाही तर या सत्ताधाऱ्यांकडून सतत होणाऱ्या चुकीच्या निर्णयातून या सरकारला त्यांची जागा दाखवण्याचे काम आपल्याला करायचे आहे असे आवाहनही अजित पवार यांनी सर्व उपस्थितांना केले.

यावेळी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही शिंदे सरकारवर जोरदार तोफ डागली.

या महामोर्चानंतर झालेल्या सभेत खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादीच्या माजी आमदार विद्याताई चव्हाण, अबु आझमी, नाना पटोले यांनी आपले विचार मांडले.

या महामोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री आदित्य ठाकरे, कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप, खासदार सुप्रियाताई सुळे, शेकापचे अध्यक्ष जयंत पाटील, सपाचे प्रमुख अबू आझमी, शिवसेना खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे, खासदार चंद्रकांत खैरे आदींसह महाविकास आघाडीचे घटक पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

NVCC की 78वीं वार्षिक आमसभा में अश्विन प्रकाश अग्रवाल (मेहाड़िया) पैनल का निर्विरोध चयन

Sun Dec 18 , 2022
NVCC की 78वीं वार्षिक आमसभा में अध्यक्ष पद हेतु अश्विन प्रकाश अग्रवाल (मेहाड़िया) एवं सचिव पद हेतु  रामअवतार तोतला निर्विरोध चयनित नागपुर – नाग विदर्भ चेंबर ऑफ  काॅमर्स की 78वीं वार्षिक आमसभा में दि. 17 दिसंबर 2022 को अग्रसेन भवन, अग्रसेन छात्रावास के पीछे, रविनगर, नागपुर में आयोजित की गयी है। जिसमें अध्यक्ष पद हेतु अश्विन प्रकाश अग्रवाल (मेहाड़िया) उपाध्यक्ष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com