– जागतिक सिकलसेल दिन जनजागृती रॅलीने साजरा
गडचिरोली :- जिल्हयात सुरु असलेल्या “मुस्कान” एक वाटचाल.. सिकल सेल मुक्त गडचिरोली कडे… हा कार्यक्रम 6 ते 19 वर्ष वयोगट शालेय तसेच शाळा बाह्य सर्वच विद्यार्थ्यांचे सिकल सेल तपासणी, आजाराबाबत आणि लग्नापूर्वीचे समुपदेशन, आजारी विद्यार्थ्यांना नियमित औषध व पाठपुरावा तसेच शासनाच्या योजनेचे लाभ मिळवून देत आहे. ‘मुस्कान’ कार्यक्रमाच्या माध्यमाने सर्व सिकल सेल रुग्णाच्या चेहऱ्यावर मुस्कान आणणे हेच आपले ध्येय असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी आज सांगितले.
जागतिक सिकल सेल दिनानिमित्त इंदिरा गांधीचौक ते महिला व बाल रुग्णालय पर्यंत जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उदघाटन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमित साळवे, वैद्यकिय अधिक्षक डॉ प्रशांत आखाडे, सहायक संचालक हत्तीरोग डॉ सचिन हेमके, जिल्हा साथरोग वैद्यकिय अधिकारी डॉ रुपेश पेंदाम यावेळी उपस्थित होते.
ऑक्टों 2023 पासून जिल्ह्यात एकूण 1530 गरोदर स्त्रियांची तपासणी करण्यात अली आहे. त्या पैकी 54 स्त्रिया या सिकल सेल वाहक म्हणुन व 17 जोडपी हे दोन्ही वाहक असल्याचे आढळले व अश्या सर्व 17 स्त्रियांची गर्भजल चाचणी करण्यात आली आहे. लग्नापुर्वी सर्वानीच सिकलसेल तपासणी करावी. उपकेंद्र स्तरावर पेशंट सपोर्ट ग्रुप हे स्थापन करण्यात यावे जेणेकरून सर्व सिकलसेल वाहक आणि रुग्ण व्यक्तीचा नियमित औषधी व आरोग्य तपासणीसाठी आणि समुपदेशनासाठी पाठपुरावा घेण्यात येईल. जिल्ह्यात सिकलसेल चे नवीन रुग्ण होऊन नये व आहेत त्या रुग्णांना नियमित आरोग्य सेवा मिळावी म्हणून जिल्हा आरोग्य विभाग हे तत्पर आहे. हे कार्यक्रम राबविण्यासाठी व कार्यक्रमाच्या सनियंत्रांसाठी पाथ ही संस्था आरोग्य विभागासोबत कार्यरत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांनी सांगितले.
यावेळी प्राचार्य उत्तम खंते, नेहा ओलाख ,जिल्हा नोडल अधिकारी डॉ पंकज हेमके,पाथ संस्था प्रकल्प अधिकारी डॉ. नरेंद्र कुंभारे,सिकलसेल कोऑडीर्रनेटर रचना फुलझेले उपस्थित होते. रॅली मध्ये श्री साईइंस्टीटयुट ऑफ नर्सिंग अँड मेडिकल सायन्स चे बीएससी व जीएनएम चे विद्यार्थी आणि सामान्य रुग्णालय परिचर्या प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थीनी, आशा स्वयंसेविका यांनी सिकलसेल विषयी बॅनर , पोस्टर व्दारे जनजागृती करुन शोभा वाढवली,यामध्ये सिकलसेल विषयी निदान ,उपचार समुपदेशन याविषयी चे पोस्टर,बॅनर लोकांचे लक्ष वेधुन घेत होते, त्यांनी सिकलसेल कार्यक्रमाविषयी समर्पक अशी प्रसिध्दी केली त्याबदृल सर्व जिल्हा स्तरीय अधिका-यांनी त्यांचे कौतुक केले. जनजागृती मध्ये रॅली चे महत्व उपस्थितांना सांगितले. डॉ.प्रशांत आखाडे, वैद्यकिय अधिक्षक जिल्हा महिला व बाल रुग्णांलय गडचिरोली यांनी उपस्थित सर्वाना सिकलसेल आजाराबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात एकुण 31 सिकलसेल रुग्णांची CBC, LFT, KFT या तपासण्या करुन त्यांना हायड्राक्सीयुरीया हे औषध सुरु करण्यात आले व सिकलसेल आजाराबाबत समुपदेशन करण्यात आले.