– पदव्युत्तर वनस्पतीशास्त्र विभाग आणि द इंडियन बॉटनिकल सोसायटी यांचा संयुक्त उपक्रम
अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा पदव्युत्तर वनस्पतीशास्त्र विभाग आणि द इंडियन बॉटनिकल सोसायटी यांचे संयुक्त विद्यमाने ‘‘वनस्पती विज्ञानातील समन्वय आणि शाश्र्वत भविष्य’’ या विषयावर 46 व्या अखिल भारतीय वनस्पतीशास्त्रीय परिषदेचे दि. 4 ते 6 नोव्हेंबर, 2023 दरम्यान विद्यापीठात आयोजन करण्यात आले आहे. ही विद्यापीठासाठी अभिनंदनाची बाब असून या निमित्ताने सदर परिषदेत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे.
वनस्पती आणि त्यांच्या सभोवतालच्या जैविक प्रणाली या भविष्यातील आरोग्यासाठी महत्वाच्या आहेत. वनस्पती, विज्ञान, संशोधन आणि प्रगतशील तंत्रज्ञानाच्या उपयोगातून अनेक समस्यांचे निराकरण करणे शक्य होवू शकते. त्यांच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, हवामान बदल, प्रजाती नष्ट होणे, वाढते प्रदूषण आदी समस्यां प्रभावीपणे हाताळल्या जावू शकतात. याची सर्वांना माहिती व्हावी, म्हणून सदर परिषदेचे आयोजन विद्यापीठाच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.
तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेमध्ये पदक पुरस्कार व्याख्यानांतर्गत डॉ. बिरबल साहानी पदक व्याख्यान, डॉ.पी. माहेस्वरी पदक व्याख्यान, डॉ.व्ही. पुरी पदक व्याख्यान, डॉ.वाय.एस. मूर्ती पदक व्याख्यान, स्मृती व्याख्यानांतर्गत ए.के. शर्मा स्मृती व्याख्यान, प्रा.एल.बी. काजळे स्मृती व्याख्यान, तसेच यंग बॉटनिस्ट पुरस्कार, वुमन सायंटिस्ट पुरस्कार, पोस्टर पुरस्कार, डॉ.एस.एन. दिक्षीत पुरस्कार, डॉ.के.एस. बिलीग्रामी पुरस्कार आदी कार्यक्रम संपन्न होणार आहे. याशिवाय डॉ. स्टिव्हन मॅन्चेस्टर (फ्लोरिडा), प्रा. जेनिफर अन (मलेशिया), प्रा. अनोमा परेरा (श्रीलंका), प्रा. अनी कुमार (जयपूर), प्रा. अरुण पांडे (भोपाळ), प्रा.ए.के. भटनागर (नवी दिल्ली), प्रा.जी.एस. शेखावत (जोधपूर), प्रा. मनोहरचारी (हैद्राबाद), प्रा.एच.के. गोस्वामी (भोपाळ), प्रा.एस.आर. यादव (कोल्हापूर) व प्रा. नितीन डोंगरवार (नागपूर) या तज्ज्ञांची विशेष निमंत्रित व्याख्याने होणार आहे.
सदर परिषदेत एकूण 28 भारतीय विद्यापीठे, 4 परदेशी विद्यापीठे, 7 राष्ट्रीय नामांकित प्रयोगशाळेमधील विषयतज्ज्ञ, वरीष्ठ बॉटनिस्ट, संशोधक, विद्यार्थी यांचा सहभाग राहणार आहे. सदर परिषदेसाठी आठ उपविषय ठेवण्यात आले आहे. जवळपास तीनशे शोधनिबंध प्राप्त झाले असून त्याचे मौखिक व पोस्टर सादरीकरण होणार आहे.
कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर व कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांच्या सहकार्याने सदर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर परिषदेमुळे भविष्यातील संशोधन, सामंजस्य करार, ज्ञानात्मक देवाणघेवाण यासाठी चालना मिळणार असून तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेला जास्तीतजास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. तुषार देशमुख व वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. वर्षा नाठार यांनी केले आहे.