कोविड मृतकाच्या नातेवाईकांना सेतू केंद्र, ऑनलाईन, क्यूआर कोडची अर्जासाठी उपलब्धता
सोपा अर्ज, तात्काळ प्रतिसाद, महाकोविड 19 रिलीफ डॉट इन संकेतस्थळाचा वापर करा
मध्यस्थांवर करडी नजर, सेतू केंद्रावरील फसवणुकीकडे पोलीसांचे लक्ष
अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक चित्रफितीचे लोकार्पण
नागपूर : कोरोना महामारीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या बाधिताच्या नातेवाईकांना 50 हजार रुपये सानुग्रह निधी देण्याच्या शासनाच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी आर. विमला यांनी या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक घेऊन गेल्या सहा दिवसांमध्ये नागरिकांनी केलेल्या अर्जांवर झालेल्या कारवाईचा आढावा घेतला. या बैठकीला पोलीस उपआयुक्त बसवराज तेली, महानगर पालिकाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सुजाता गंधे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला दाखलेकर, जिल्हा उपआरोग्य अधिकारी डॉ. असीम इनामदार आदींची यावेळी उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी आर. विमला यांनी यावेळी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज कसा भरावा यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालयाने निर्माण केलेल्या चित्रफितीचे अनावरण केले. नागरिकांनी ऑनलाइन अर्ज करावे. ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांनी सेतू केंद्राची मदत घ्यावी, आपला अर्ज दाखल केल्यानंतर लगेच मदत मिळेल याची ग्वाही नागरिकांना देण्याची सूचना केली.
सर्व सेतू केंद्रावर हे अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच महानगरपालिका क्षेत्रातील नागरी सुविधा केंद्रावर देखील ही सुविधा उपलब्ध आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सेतू केंद्रावर कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना सौजन्याने हे अर्ज भरून देण्याचे त्यांनी निर्देशित केले. अतिशय सोपी माहिती अर्जात दयावी लागणार आहे.
जिल्हा व महानगर पालिका प्रशासनाकडे कोविडमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नोंदी आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांच्या नोंदी यापूर्वी झालेल्या आहेत. त्यांना तातडीने राज्य शासनामार्फत मदत केली जाणार आहे. ज्यांच्या मृत्यू दाखल्यावर ( डेड सर्टीफिकेटवर ) डॉक्टरांनी कोविडमुळे मृत्यू लिहिले आहे. त्यांना देखील तातडीने मदत केली जाणार आहे. ज्यांच्या डेड सर्टिफिकेट व अन्य कागदपत्रांमध्ये काही समस्या आहेत. या संदर्भात तक्रारी सोडवा, असे निर्देश त्यांनी दिले आहे. काही ठिकाणी असामाजिक तत्त्व, असाह्य नागरिकांना अर्ज भरून देण्याच्या नावाखाली फसवणूक करत आहे, अशा लोकांना पोलीस प्रशासनाने हेरून कारवाई करावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांना त्यांनी नागरिकांना मास्क अत्यावश्यक करा, गरज पडल्यास पुन्हा एकदा मास्कशिवाय बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करा, कोरोनाचे संकट अद्याप टळले नाही. त्यामुळे याबाबतीत जागरूक रहावे, असे आवाहन केले. सामान्य नागरिकांनी देखील कोरोना प्रोटोकॉल पाळणे आवश्यक आहे. जिल्ह्यात नव्या विषाणू संदर्भात घाबरून जाणे गरजेचे नाही. मात्र काळजी घेणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या संकेतस्थळावर अर्ज करा कोविड आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटतम नातेवाईकास 50 हजार रुपयांचे सहाय्य मिळणार असून त्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ई-अर्ज दाखल करता येईल. यासाठी राज्य शासनाने http://mahacovid19relief.in ( महाकोविड19 रिलीफ डॉट इन ) संकेतस्थळावर संबंधितांनी लॉगीन करून अर्ज करण्याचे आवाहन आहे.