कृष्णानगर :- दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता उघडपणे मोदींविरोधात व्होट जिहादचे आवाहन करत आहेत. अनेक दशकांपासून देशात पडद्याआडून सुरू असलेला जिहादचा हा खेळ नैराश्यग्रस्त विरोधकांकडून उघडपणे सुरू झाला असून विकसित भारतासाठी मतदान करून देशातील जनता त्याला योग्य उत्तर देईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. व्होट जिहादच्या या आवाहनावर काँग्रेस, तृणमूल आणि डावे यांच्यासह इंडी आघाडीचे सर्व पक्ष गप्प बसले असून व्होट जिहादला त्यांचा पाठिंबा आहे, हाच याचा स्पष्ट अर्थ आहे, असा आरोपही पंतप्रधानांनी केला.
पश्चिम बंगालमधील वर्धमान-दुर्गापूर, कृष्णानगर आणि बोलपूर येथे शुक्रवारी झालेल्या विशाल जाहीर सभांना संबोधित करताना,पंतप्रधान मोदी यांनी तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत पश्चिम बंगालच्या दुरवस्थेवर आणि काँग्रेसच्या व्होट जिहादच्या आवाहनावर जोरदार निशाणा साधला. बंगाल भाजपा प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार, वर्धमानचे माजी उमेदवार असीम कुमार सरकार, वर्धमान दुर्गापूरचे उमेदवार दिलीप घोष, कृष्णानगरचे उमेदवार राजमाता अमृता रॉय, राणाघाटचे उमेदवार जगन्नाथ सरकार, बहरामपूरचे उमेदवार निर्मल कुमार साहा, बोलपूरच्या उमेदवार प्रिया साहा आणि बीरभूमचे उमेदवार देबाशिष धर यांच्यासह इतर नेते यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या व्होट बँकेच्या हितासाठी इंडी आघाडी काहीही करू शकते, असा इशारा देऊन पंतप्रधान मोदी म्हणाले की, आता जनतेच्या मालमत्तेचा एक्स-रे करण्याचे व ती मालमत्ता त्यांच्या खास मतपेढ्यांमध्ये वाटून टाकण्याची भाषा काँग्रेस नेते उघडपणे करत आहेत. आपली मतपेढी वाढविण्याचा छुपा कट असलेल्या तृणमूल काँग्रेसने व डाव्यांनी काँग्रेसच्या या डावाला विरोधही केला नाही, याकडेही पंतप्रधानांनी देशाचे लक्ष वेधले. देशाची राज्यघटना धर्मावर आधारित आरक्षणाच्या विरोधात आहे, पण काँग्रेस धर्मावर आधारित आरक्षण देण्याचा डाव रचत असून एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण हक्क हिरावून घेण्यासाठी आणि विशेष व्होट बँकेला कोटा देण्यासाठी काँग्रेसला संविधान बदलायचे आहे. आरक्षण लुटून काँग्रेसला दलित, ओबीसी, एससी, एसटी यांना मोदींना मतदान करण्याची शिक्षा करायची आहे. हे काम काँग्रेसमध्ये सुरू झाले असून, या महापापानंतरही टीएमसी आणि डावे गप्प आहेत, असे ते म्हणाले. गेल्या शतकाचा विचार करणारी इंडी आघाडी देशाच्या भविष्याचा कधीच विचार करू शकत नाही. हे लोक तीन दशके नवीन शैक्षणिक धोरण देखील आणू शकले नाहीत पण मोदींनी नवीन शैक्षणिक धोरण आणून देशाच्या शिक्षणाचे आधुनिकीकरण केले. काँग्रेसने 60 वर्षांत जितकी वैद्यकीय महाविद्यालये बांधली, तितकी वैद्यकीय महाविद्यालये भाजपाने अवघ्या 10 वर्षांत बांधली. काँग्रेसला 60 वर्षात फक्त 7 एम्स बांधता आली पण भाजपाने 10 वर्षात एम्सची संख्या 22 वर नेली, अशी माहितीही मोदी यांनी यावेळी बोलताना दिली.
मोदी म्हणाले की, गेल्या 10 दिवसांपासून काँग्रेस माझ्या आव्हानावर गप्प बसली आहे. धर्माच्या आधारे आरक्षण देण्यासाठी संविधानात कोणतेही बदल करणार नाही, धर्माच्या आधारावर एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणाची विभागणी करणार नाही आणि जिथे त्यांची राज्य सरकारे आहेत, तिथे ओबीसींचा कोटा कापून कोणत्याही विशिष्ट वर्गाला आरक्षण दिले जाणार नाही, असे काँग्रेसने देशाला लिखित स्वरूपात जाहीर करावे, असे आव्हानही त्यांनी दिले. मोदी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला असे लुटू देणार नाही. काँग्रेसने धर्माच्या आधारे देशाची फाळणी केली आणि शेजारील देशांमध्ये राहणाऱ्या हिंदू, जैन, ख्रिश्चन, पारशी आणि शीख अल्पसंख्याकांना संरक्षण देण्याचे आश्वासन दिले. काँग्रेसने 75 वर्षांत एकही आश्वासन पूर्ण केले नाहीच, उलट भाजपने या लोकांच्या संरक्षणासाठी सीएए कायदा आणला तेव्हा त्याला विरोधही केला. काँग्रेस आणि टीएमसीसह संपूर्ण आघाडी सीएए रद्द करण्याविषयी बोलत आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातही सरकारी कंत्राटांमध्ये विशिष्ट वर्गांना आरक्षण देण्याबाबत सांगितले आहे, असे ते म्हणाले.
माझा जन्म मौजमजा करण्यासाठी झाला नाही, तर जनतेच्या चरणांची धूळ डोक्यावर लावून महान भारताच्या 140 कोटी देशवासीयांची सेवा करण्यासाठी मी बाहेर पडलो आहे. जनतेची स्वप्ने पूर्ण करणे हेच माझे स्वप्न आहे, कारण देशातील जनताच माझे कुटुंब आहे. मी गरीब कुटुंबातील मुलगा असल्यामुळे मला गरिबांचे हाल समजतात. आता एकही भारतीय असे गरिबीचे जीवन जगणार नाही. गेल्या 10 वर्षात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. भारताचा विकास झाला तर देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचा फायदा होईल आणि प्रत्येक भारतीयाचे उत्पन्न वाढेल. गेल्या 10 वर्षात महिला बचत गटांमध्ये 10 कोटी महिला सामील झाल्या, यांपैकी एक कोटी महिला लखपती दीदी बनल्या आहेत आणि या गटातील तीन कोटी भगिनी लखपती दीदी बनतील. आता प्रधानमंत्री सूर्यघर योजनेंतर्गत घरपोच सोलर पॅनलसाठी पैसे दिले जातील आणि त्याच्या वापराने जनतेचे वीज बिल शून्य होईल आणि सर्वसामान्यांना जादा वीज विकून पैसेही मिळू शकतील, अशी हमीदेखील पंतप्रधानांनी यावेळी दिली.
केंद्र सरकारच्या प्रत्येक योजनेला तृणमूल काँग्रेसचे गुंड लुटत आहेत. टीएमसीच्या घोटाळेबाजांनी शिक्षक भरतीत लाखो तरुणांची फसवणूक केली आहे. आता जनतेने तृणमूल काँग्रेसच्या अशा भ्रष्ट नेत्यांना ओळखले आहे. शिक्षक भरतीमध्ये पात्र शिक्षकांना मदत करण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपा राज्य स्तरावर कायदेशीर सेल तयार करत आहे – ही मोदींची हमी आहे. टीएमसीच्या गुंडांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही आणि प्रत्येक गुन्हेगाराला जबाबदार धरले जाईल,असा इशारा देऊन,भाजपा उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा, प्रत्येक बूथवर कमळ फुलवा आणि देशात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन करून विकसित भारत घडवण्यासाठी योगदान द्या, असे आवाहनही मोदी यांनी केले.