-प्रशिक्षण घेतलेल्या श्रामनेरांना प्रमाणपत्र
-बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकापर्ण
नागपूर :- बाबासाहेबांचा जयघोष करण्यासोबतच त्यांनी दाखविलेल्या मार्गाचा अवलंब आणि त्यांचे विचार आत्मसात केल्यास जीवनात प्रगतीचे शिखर गाठता येतील, असे प्रतिपादन दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेनानायक भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी, शाखा उंटखाना येथील बुद्धिस्ट सेमिनरीच्या वर्धापनदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण भदन्त धम्मसारथी यांच्या हस्ते झाले. लोकार्पण सोहळ्या प्रसंगी भदन्त ससाई बोलत होते. मंचावर स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले, डॉ. प्रदीप आगलावे, एन.आर. सुटे, अॅड. आनंद फुलझेले, भदन्त नागदीपंकर उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षण घेतलेल्या श्रामनेरांना प्रमाणपत्र देण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या बांधवांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूलमंत्र दिला. या मूलमंत्रामुळेच समाजबांधवांमध्ये जागृतीचे किरणे पडली, असेही ससाई म्हणाले. यावेळी डॉ. सुधीर फुलझेले म्हणाले उंटखाना येथील बुद्धिस्ट सेमिनरीला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त बाबासाहेबांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. या सेमिनरीच्या माध्यमातून बुध्द आणि बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार प्रसार व्हावा, अशी दीक्षाभूमी स्मारक समितीची भुमिका आहे.
प्रस्ताविक अभिषेक सारनाथ यांनी केले. संचालन अशोक जांभूळकर यांनी तर आभार डॉ. आगलावे यांनी मानले. कार्यक्रमाला भदन्त धम्मसारथी, भदन्त नागवंश, भदन्त भीमा बोधी, धम्म बोधी, भदन्त नागसेन, भदन्त मिलिंद, भदन्त धम्म विजय, धम्मशील, धम्मविद्या, नागाप्रकाश, भिक्खूनी संघप्रिया, समता सैनिक दलाचे प्रदीप डोंगरे, बालकदास बागडे, रवी गजभिये यांच्यासह भिक्खू संघ, भिक्खुनी संघ, उपासक, उपासिका आदी उपस्थित होते.