‘बहुमताचा वापर करून भाजपाने देशाचा विकास केला ‘! काँग्रेसी अपप्रचाराला बळी पडू नका – अकोला येथील सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आवाहन

अकोला :- भाजपाला 400 हून अधिक जागांवर विजय मिळाला तर संविधान बदलणार, आरक्षण रद्द करणार, असा अपप्रचार काँग्रेसकडून केला जात आहे. या अपप्रचाराला बळी पडू नका, गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने आरक्षण रद्द केले नाही, तर बहुमताचा वापर करून 370 कलम रद्द केले, दहशतवाद संपविला, तिहेरी तलाक प्रथा रद्द केली आणि सीएए कायदा जारी करण्यासाठी बहुमताचा उपयोग केला. जोपर्यंत देशात भारतीय जनता पार्टी आहे, तोवर एससी, एसटी व ओबीसींचे आरक्षण कोणीही रद्द करू शकणार नाही, ही मोदींची गॅरंटी आहे, अशी ग्वाही आज केंद्रीय गृहमंत्री व भाजपा नेते अमित शाह यांनी मंगळवारी दिली.

अकोला येथे भाजपा उमेदवार अनुप संजय धोत्रे यांच्या प्रचार सभेत बोलताना प्रारंभी अमित शाह यांनी प्रचंड समुदायाकडून विजय संकल्पाचा उच्चार करवून घेतला आणि सभेत जय श्रीरामाचा जयघोषही उमटला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.रणधीर सावरकर, आ.संजय कुटे, आ.प्रकाश भारसाकळे, आ.वसंत खंडेलवाल, राष्ट्रवादीचे नेते आ.अमोल मिटकरी, शिवसेनेच्या खा.भावना गवळी, आ.श्वेता महाले आदी नेते मंचावर उपस्थित होते.

शाह म्हणाले की, अयोध्येतील राम मंदिराला काँग्रेसचा व इंडी आघाडीचा कायमच विरोध होता. त्यामुळेच स्वातंत्र्य मिळून 70 वर्षानंतरही काँग्रेस व त्यांच्या आघाडीने अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न लोंबकळत ठेवला. सत्तेवर आल्यानंतर पाच वर्षांतच मोदी यांनी राम मंदिराची उभारणी केली, आणि रामलल्लाची प्रतिष्ठापनाही करून मोदी यांनी रामभक्तांची अनेक दशकांची इच्छाही पूर्ण केली. विकासाची कावडयात्रा खांद्यावर घेऊन मोदीजी देशाचा कानाकोपऱ्यात पोहोचत आहेत. दहा वर्षांत मोदीजींनी देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली. पुन्हा सत्तेवर आल्यावर पाच वर्षांतच अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर येणार असून याचा फायदा, दलित, आदिवासी, वंचित, उपेक्षित, सर्वांना होणार आहे. म्हणूनच, मोदीजींच्या झोळीत मतांचे दान टाकून भाजपाला प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहनही शाह यांनी केले. अनुप धोत्रे यांच्यासाठी दिले जाणारे एकएक मत मोदीना पुन्हा पंतप्रधान करणारे ठरणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्रातील एकएक तरुण काश्मीरसाठी प्राण देण्यास सिद्ध आहे, पण काँग्रेसला याची जाणीवच नाही. कलम 370 रद्द करून मोदीजींनी काश्मीरला भारताचा कायमसाठी अविभाज्य भाग बनविला, तर काँग्रेस मात्र कलम 370 ला एखाद्या अनौरस अपत्याप्रमाणे कवटाळून बसली होती, अशी टीकाही शाह यांनी केली. दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसविल्यावर 5 ऑगस्ट 2019 ला मोदींनी कलम 370 रद्द केले. दहा वर्षे सोनिया-मनमोहनसिंह यांचे सरकार होते, शरद पवार हे त्यांच्या सरकारात मंत्री होते, त्यांच्या काळात पाकिस्तानातून येऊन अतिरेकी भारतात बॉम्बस्फोट करून आरामात निघून जात होते आणि काँग्रेस मात्र हातावर हात घेऊन स्वस्थ बसत होती. मोदीजी सत्तेवर आले आणि पुलवामावर केलेल्या हल्ल्याची किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल असा धडा त्यांनी शिकविला. पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करून मोदींनी दहशतवादाचा सफाया केला. महाराष्ट्राला नक्षलवादापासून मुक्त करण्याचे काम मोदीनी केले.

काँग्रेस सत्तेवर आली तर तिहेरी तलाक पुन्हा सुरू करण्याची काँग्रेसची भूमिका आहे. पण काँग्रेसला पुन्हा सत्ता द्यायची नाही असा निश्चय जनतेनेच केला आहे, असे सांगून शाह यांनी मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीतील जनहिताच्या कामांचा संपूर्ण तपशील सभेपुढे ठेवला. मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यावर सत्तर वर्षांवरील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचार, घरोघर पाईपद्वारे गॅस जोडणी ही मोदी सरकारची गॅरंटी आहे, असेही ते म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मतदान केंद्रावर मतदारांसाठी विविध सुविधांची उपलब्धता राहणार - डॉ.पंकज आशिया

Wed Apr 24 , 2024
– पाणी, औषधे, प्रथमोपचाराची सुविधा – उन्हापासून बचावासाठी केंद्रांवर शेड यवतमाळ :- येत्या दिनांक २६ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान व्हावे यासाठी प्रशासनाच्यावतीने सातत्याने जनजागृती करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर मतदारांच्या सोईसाठी विविध सोईसुविधा उपलब्ध देण्यात येत आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने निवडणुकीच्या या उत्सवात जिल्ह्याची मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले आहे. गेल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com