नागपूर :- स्वच्छ, सुंदर नागपूरसाठी महिन्याच्या पहिल्याच दिवशी राबविण्यात येत असलेल्या ‘एक तारीख, एक तास, एक साथ’ या अभिनव उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बुधवारी १ मे रोजी नागपूर महानगरपालिकेद्वारे दहाही झोनमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात आणि अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या नेतृत्वात प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.दहाही झोनचे झोनल अधिकारी रामभाउ तिडके, दिनदयाल टेंभेकर, दिनेश कलोडे, धर्मेंद्र पाटील, विठोबा रामटेके, सुरेश खरे, राजीव राजुरकर, प्रमोद आत्राम, सुनील तांबे आणि भूषण गजभिये यांच्या नेतृत्वात प्रत्येक झोनमध्ये स्वच्छता कर्मचारी तसेच नागरिकांद्वारे एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्यात आले.मनपाच्या लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमान नगर, धंतोली झोन, नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आशीनगर आणि मंगळवारी या दहाही झोनमध्ये ‘एक तास एक तारीख एक साथ’ अभियानांतर्गत स्वच्छतेसाठी श्रमदान करण्यात आले. बुधवारी १ मे कामगार दिनानिमित्त दहाही झोनमध्ये सफाई कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला. सफाई कर्मचा-यांना पुष्पगुच्छ देउन त्यांच्या कार्याप्रति सन्मान व्यक्त करण्यात आला.