मुंबई :- ऑईल इंडिया लिमिटेड (ओआयएल) या कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 साठीचा आर्थिक ताळेबंद जाहीर केला असून त्यात कंपनीचे कार्य सुरु झाल्यापासून आतापर्यंतच्या काळात प्रथमच सर्वात उच्चांकी असलेला 6810.40 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे दिसते आहे. कंपनीच्या कामकाजातून वाढलेले उत्पन्न आणि तेल तसेच वायू उत्पादनात झालेली वाढ यांच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीच्या नफ्यामध्ये 75.20% वाढ नोंदवण्यात आली आहे.
गेल्या सहा दशकांमध्ये ओआयएलने त्यांच्या परिपक्व आणि गेल्या आर्थिक वर्षात नुकत्याच नव्याने शोधलेल्या तेल क्षेत्रांतून अधिकाधिक तेल तसेच वायू उत्पादन करण्यात सातत्य ठेवले आहे. कंपनीने तेल उत्पादनात 5.5% वाढ नोंदवत 3.18 दशलक्ष टन तेल उत्पादन केले असून वायू उत्पादनात 4.4%ची वाढ नोंदवत 3.18 अब्ज घनमीटर वायूचे उत्पादन केले आहे. कंपनीची स्थापना झाल्यापासून आतापर्यंतच्या काळात कंपनीने केलेले हे सर्वाधिक वायू उत्पादन असून हाही एक विक्रम कंपनीच्या खाती जमा झाला आहे.
ऑईल इंडिया लिमिटेड कंपनीची थोडक्यात माहिती:
ऑईल इंडिया लिमिटेड (ओआयएल) ही अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रातील संपूर्णपणे एकात्मिक, संशोधन आणि उत्पादन कंपनी आहे. ओआयएल ही नवरत्न दर्जाची आणि भारत सरकारची मालकी असणारी कंपनी आहे. या कंपनीचे प्रशासकीय नियंत्रण केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडे असून ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची राष्ट्रीय तेल आणि वायू निर्मिती कंपनी आहे.