– क्षमता बांधणी कार्यशाळेत मनपा आयुक्तांचे अधिकारी, कर्मचा-यांना मार्गदर्शन
नागपूर :- स्वच्छतेचे कार्य हे कुठल्या एका विभागाचे अथवा अधिकाऱ्याचे नसून, ते सर्व विभाग आणि अधिकारी, कर्मचा-यांच्या समन्वयाने आणि सक्रीय सहभागाने केले जाणारे कार्य आहे. समन्वयाने नागपूर शहराचा चेहरामोहरा बदलण्यात वेळ लागणार नाही. सर्वांच्या सक्रीय सहभागाने आणि उत्तम समन्वयातून स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर या संकल्पनेची स्वप्नपूर्ती होईल आणि नागपूर शहराचा स्वच्छ सर्वेक्षणात दर्जा उंचाविण्यासाठी मदत होईल असे प्रतिपादन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मंगळवारी (ता.१९) स्वच्छ सर्वेक्षण २०२४ च्या अंतर्गत महाल येथील मनपाच्या “श्रीमंत राजे रघुजी भोसले सभागृह (टाउन हाल) येथे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेत अधिकारी व कर्मचा-यांची क्षमता बांधणी कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त रवींद्र भेलावे, निर्भय जैन, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, डॉ. श्वेता बॅनर्जी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांचासह दहाही झोनचे सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता, उप अभियंता, झोनल अधिकारी, सर्व स्वच्छता निरीक्षक, उपद्रव शोध पथकाचे अधिकारी, जवान व विविध संघटनेचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यशाळेत नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील व्यावसायिक ठिकाणांची साफ-सफाई, नागरिकांद्वारे कचरा टाकण्यात येणारी ठिकाणांचे निर्मुलन व सौदर्यांकरण तसेच स्वच्छ सर्वेक्षण २०२४ करीता करावयाच्या कामांबाबतचा कृती आराखडा याविषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
उपस्थितांना मार्गदर्शन करीत आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, शहर स्वच्छ करण्यासाठी आणि नागरिकांना मुलभूत सोयी देण्यासाठी महानगरपालिका नेहमीच प्रयत्नशील राहिलेली आहे. परंतू संपूर्ण शहर स्वच्छ ठेवायचे म्हटले की, त्यात स्वतःची इच्छा आणि लोकसहभाग हा तितकाच महत्वाचा आहे. लोकसहभागाशिवाय कुठलाही हेतू साध्य करता येणार नाही, “हे संपूर्ण शहर माझे घर आहे” अशी मानसिकता झाल्याशिवाय शहर स्वच्छ ठेवता येणार नाही, अधिकारी व कर्मचारी वर्गाने देखील स्वच्छतेसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाला केवळ उपक्रम न बघता ‘माझ्या शहरासाठी हे माझे कार्य’ अशी भावना मनात ठेवायला हवी.
शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ बनवून स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेद्वारे वाटचालीची सुरुवात करण्यात आली. अशात सर्व विभागांनी स्वच्छतेला प्राधान्यदेत समन्वयाने कार्य करायला हवे, अधिकाऱ्यांनी नागरिकांद्वारे कचरा टाकण्यात येणाऱ्या ठिकाणांची माहिती घेऊन त्या ठिकाणी कशा प्रकारे सौदार्यीकरण करता येईल याचा आराखडा तयार करावा, नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकू नये यासाठी त्यांचे प्रबोधन व जनजागृती करावी, संबंधित विभागाने आपली जबाबदारी निश्चित करून व्यवस्थितपणे नियोजन करावे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण कार्याचा वेळोवेळी आढावा घ्यावा, RRR केंद्रांवर भर देत नव्या केंद्रांसाठी जागा सुनिश्चित करावी, नागरिकांच्या तक्रारींचे लवकर निर्मूलन करावे, असे निर्देश आयुक्तांनी यावेळी संबंधित विभागाला दिले. तसेच मनपातील विविध विभागांच्या अधिकारी आणि कर्मचा-यांना प्रोत्साहन देऊन त्यांना पुढील कार्यासाठी आयुक्तांनी शुभेच्छा देखील दिल्या.
कार्यशाळेत सर्वप्रथम मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी सादरीकरणाद्वारे स्वच्छ सर्वेक्षणातील अनेक बारकावे मांडले. त्यांनी स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत प्राधान्याने कार्य करण्याच्या बाबी, दैनंदिन कार्यात करावयाच्या सुधारणा आदींबाबत उदाहरणांसह सविस्तर विवेचन केले. मनपाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना, स्वच्छ मार्केट स्पर्धा, स्वच्छ मोहल्ला स्पर्धा, इको ब्रिक्स स्पर्धा, एक तारीख, एक तास आदी उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये शहराप्रती आत्मीयता निर्माण कार्यासाठी अधिकारी व झोनल स्वच्छता कर्मचाऱ्यांनी प्रतिनिधित्व करावे असे श्रीमती आंचल गोयल यांनी सांगितले. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी स्वच्छ सर्वेक्षणातील मनपाची आधी स्थिती आणि चुकांचे विवेचन करून त्यावरील पुढील कार्यवाही मांडली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले.
*शून्य कचरा’ वर आधारित कार्यक्रम*
स्वच्छ सर्वेक्षणाच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेद्वारे महत्वाचे उचलले जात आहे. मंगळवारी घेण्यात आलेली कार्यशाळा पूर्णत: ‘झिरो वेस्ट’ अर्थात कचरा विरहित कार्यशाळा ठरली. कार्यशाळेदरम्यान कुठल्याही प्रकारचा कचरा निर्माण होऊ देण्यात आलेला नाही. तसेच कचरा निर्माण होऊ शकणा-या बाबी टाळण्यात आल्या. उपस्थितांना चहापानासाठी काचेच ग्लास आणि कप वापरण्यात आले. मान्यवरांच्या स्वागतासाठी मातीच्या लहान कुंडीत असलेले तुळशीचे रोप देण्यात आले.