मुंबई, दि. 25 :- देशाच्या स्वातंत्र्यासाठी तसेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित ठेवण्यासाठी प्राणांचे बलिदान केलेल्या शहीद वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले असून देशवासियांना प्रजासत्ताकाच्या 72 व्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ‘विविधतेत एकता’ ही आपली ताकद असून जात, धर्म, भाषा, पंथ, प्रांताच्या भिंती ओलांडून समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी एकत्र येण्याचे आणि एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन उपमुख्यंत्र्यांनी राज्यातील जनतेला, देशवासियांना केले आहे.
भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आपला देश स्वतंत्र झाला, प्रजासत्ताक झाला, त्यावेळचा काळ देशासाठी खूपच कठीण होता. देशासमोर अनेक आव्हाने होती. परंतु गेली 72 वर्षे हे प्रजासत्ताक आपण टिकवलं, वाढवलं, सुरक्षित केले. जगातल्या इतर देशात लोकशाहीला धक्के बसत असताना आपली लोकशाही सुरक्षित राहिली, याचं श्रेय देशातील जनतेला, जनतेच्या लोकशाहीवरच्या विश्वासाला असल्याचे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी लोकशाही व्यवस्थेवर, राज्यघटनेवर अढळ विश्वास असलेल्या तमाम देशवासियांना वंदन केले आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या, देशाच्या जडणघडणीत योगदान दिलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या योगदान, त्यागाबद्दलही उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विविध पुरस्कारांनी सन्मानीत झालेल्या मान्यवरांचे, राष्ट्रपती पदक जाहीर झालेल्या राज्याच्या पोलिस, अग्निशमन सेवेतील पुरस्कार विजेत्यांचे, ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’विजेत्या बालकांचेही उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.