शहिद शंकरराव महाले यांच्या घरी मनपाने लावले नामफलक

-महापौर दयाशंकर तिवारी यांची संकल्पना : शहरातील ३०१ स्वातंत्र्य सैनिकांच्या घरी लागणार फलक

नागपूर, ता. २६ : भारतीय स्वातंत्र्य लढ्याला गौरवशाली इतिहास आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांचे रक्त सांडले त्यात नागपूर शहरातील योद्ध्यांचेही योगदान मोठे आहे. या स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याचा सन्मान करतानाच त्यांच्या परिवाराचे आभार मानावे व या माध्यमातून आपण उपभोगत असलेल्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती शहरातील नव्या पिढीला व्हावी या उद्देशाने महापौर दयाशंकर तिवारी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात अभिनव संकल्पना मांडली. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५वी जयंती हा तिहेरी योग साधत या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. महापौरांच्या संकल्पनेतून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सर्वस्व अर्पण करणाऱ्या नागपूर शहरातील स्वातंत्र्य सैनिकांच्या घरापुढे नामफलक लावण्यात येत आहे. त्याची सुरूवात बुधवारी (२६ जानेवारी) नवाबपुरा येथील शहिद शंकरराव महाले यांच्या निवासस्थानापासून करण्यात आली.

 यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, गांधीबाग झोन च्या सभापती श्रद्दा पाठक, उपायुक्त मिलिंद मेश्राम, नगरसेवक राजेश घोडपागे आणि महाले यांच्या परिवाराचे लोक उपस्थित होते.

            देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या योद्ध्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या घरापुढे मनपातर्फे नामफलक लावून त्यांच्या परिवाराचे आभार मानणारे संदेश त्यावर शहरातर्फे कृतज्ञता व्यक्त करण्याच्या महापौरांच्या या संकल्पनेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. नागपूर शहरातील ३०१ स्वातंत्र्य सैनिकांच्या घरापुढे असे नामफलक लावण्यात येणार आहेत. शहिद शंकरराव महाले यांनी १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात इंग्रज सरकारच्या विरोधात भाग घेतला होता. त्यांचे वडील दाजीबाजी महाले यांना या आंदोलनात गोळी लागली होती. त्या विरोधात नागरिकांनी नवाबपुराच्या पोलीस चौकीमध्ये आग लावली होती. या आंदोलनाचे नेतृत्व शाहिद शंकर महाले यांनी केले होते. त्याविरोधात इंग्रजांनी त्यांना अटक करून फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र त्यावेळी शंकरराव केवळ १६ वर्षाचे होते. पुढे दोन वर्ष त्यांना कारागृहात ठेवून नंतर फाशी देण्यात आली. स्वातंत्र्य चळवळीतील आंदोलनात देशात सर्वात कमी वयात शंकरराव महाले यांनी देशासाठी प्राण अर्पण केले. फाशीची शिक्षा होण्यापूर्वी आईची भेट झाली तेव्हा रडत असणाऱ्या आईची शंकररावांनी समजून काढताना सांगितले होते की, ‘मी तुमच्या पोटी पुन्हा जन्म घेईन.’ शंकरराव महाले यांच्या पुतळ्याचे अनावरण देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केले होते. यावेळी त्यांच्यासोबत इंदिरा गांधी सुद्धा होत्या, असे त्यांच्या परिवारातर्फे सांगण्यात आले. लाल किल्ल्यावर सुद्धा शंकर महाले यांचे तैलचित्र लावण्यात आले आहे.

            याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी  यांनी सांगितले की, मनपातर्फे अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला आहे. देशाला गुलामीतून काढण्यासाठी नागपूरच्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी मोठी भूमिका बजावली होती. ज्यांचे नाव केंद्र शासनाच्या यादीमध्ये आहे त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या घरासमोर नामफलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या परिवारातून कोणी स्वातंत्र्य सैनिक होते याची माहिती सध्याच्या पिढीला सुद्धा नाही. भारतीय स्वातंत्र्यामागील आपल्या शहरातील व्यक्तींचे योगदान, त्यांचे बलीदान नव्या पिढीला माहित व्हावे. त्यांना त्यापासून प्रेरणा मिळावी, हा सुद्धा या उपक्रमाचा उद्देश आहे. शहिद शंकरराव महालेंना इंग्रजांनी १६ वर्षाच्या वयात अटक केली होती. फाशी १८ वर्षांपूर्वी देत नसल्यामुळे त्यांना दोन वर्ष कारागृहात डांबून ठेवले होते. जेव्हा ते १८ वर्षाचे झाले, त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी रात्री फाशी लावण्यात आली होती. आज हा इतिहास नागरिकांना माहित नाही. त्या भागातील नागरिकांना माहित नाही. याची माहिती देण्यासाठी हा नाव फलक लावण्यात आला आहे. या नाव फलकात ‘भारताला स्वातंत्र्य मिळविण्यात आपल्या परिवाराची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. आपल्या परिवारास शतश: नमन’ असा संदेश प्रदर्शित करण्यात आला आहे.

            यावेळी वासुदेव महाले, गीता महाले, गजाननराव महाले, शंकरराव महाले, मारोतराव महाले, आशिष महाले, सामाजिक कार्यकर्ते किशोर पालांदूरकर, सुबोध आचार्य, आशिष भुते, संजय वाट, अनिल मनापुरे, निकिता पराये, उषा बेले व मनपा चे दहीकर उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

नियमानुरूप वर्तनुकीतून राष्ट्राप्रती जबाबदारी आणि प्रेम प्रतित

Thu Jan 27 , 2022
-प्रजासत्ताकदिनी महापौर दयाशंकर तिवारी यांचे प्रतिपादन नागपूर, ता. २६ : भारतीय स्वातंत्र्याला ७५वर्ष पूर्ण होत आहेत. भारतीय स्वातंत्र्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे मोठे योगदान आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत स्फुल्लींग चेतविण्यासाठी त्यांनी ‘तुम मुझे खुन दो, मैं तुम्हें आजादी दुंगा’ असा नारा दिला होता. आज आपण स्वतंत्र भारताचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. आज आधीसारखी स्थिती नसली तरी आज आपण आपले वर्तन सुधारूनही आपल्या देशाप्रती आपले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com