तक्रारी करूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेना
कामठी ता प्र 3- स्थानिक नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र 16 येथील कुंभारे कॉलोनी, सम्राट नगर,छत्रपती नगर आदी भाग हे दलित वस्तीत समावेशक असून दलित वस्त्यांचा विकास व्हावा या मुख्य उद्देशाने शासनाकडून दरवर्षी नगर परिषद ला करोडो रुपयाचा निधी प्राप्त होत असतो मात्र येथील नगर परिषद प्रशासनाच्या कामचुकार कार्यप्रणालीमुळे या दलित वस्त्यांचा विकास न झाल्याने बकास झाल्या आहेत तर बिडी कामगारांची वसाहत म्हणून प्रसिद्धीस असलेल्या कुंभारे कॉलोनीत अजूनही पाण्याचा ठणठणाट आहे.तर या परिसरातील काही भागात मागील कित्येक दिवसापासून पासून नळाला पाणी येत नसल्याने या नागरिकांची ‘घरी नळ तरी पाण्याचा रड’अशी अवस्था आहे .यासंदर्भात परिसरातील जागरूक नागरिक उदासभाऊ बन्सोड यांच्या नेतृत्वात परिसरातील नागरिकांच्या समवेत नगर परिषद ला सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.तरीही तक्रारीची कुठलीही दखल न घेतल्याने नागरिकांच्या ज्वलंत समस्ये संदर्भात कामठी नगर परिषद प्रशासन किती गांभीर्याची भूमिका घेते हे दिसून येते.
कामठी शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची 24 तास सेवा मिळावी यासाठी तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठी नगर परिषद ला मागील तीन वर्षांपूर्वीच 5 कोटी 76 लक्ष 43 हजार रूपयाचा निधी देत तीन ठिकानो पाण्याच्या टाक्या उभारण्याचे नियोजित होते त्यानुसार कुंभारे कॉलोनी येथे या टाकी बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला मात्र मागील काही महिन्यांपासून बंद अवस्थेत असलेल्या या अर्धवट बांधकामामुळे अर्धवट असलेला हा खड्डा जीवितहानी ला निमंत्रक ठरतो तरीही नगर परिषद प्रशासन याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे.
पूर्वी कामठी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नगर परिषद ला महानगर पालिकेकडून पाणी विकत घ्यावे लागत होते त्यातही फक्त 3.6दशलक्ष लिटर्सप्रतिदिन इतकेच पाणी मिळत होते त्यामुळे कामठी शहरात पाण्याची भीषण टंचाई होती यावर मात करण्यासाठी शहरात स्वतंत्र पाणी पुरवठा ची सोय व्हावी यासाठी माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांनी आंदोलने केली व या संघर्षशील नेतृत्वाने कामठी शहरासाठी स्वतंत्र प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळवीत 28.25कोटीच्या निधीतून 16 एप्रिल 1998 ला तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे,तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी , माजी राज्यमंत्री एड सुलेखाताई कुंभारे यांच्या मुख्य उपस्थितीत कामठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे मोठ्या थाटात भूमिपूजन करण्यात आले होते.तर 19 डिसेंबर 2001 ला माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख , तत्कालीन विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी यांच्या शुभ हस्ते या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण करण्यात आले यानुसार शहरव्यतिरिक्त आजनी, गादा,घोरपड, रनाळा व येरखेडा ह्या पाच गावाला ही पाणीपुरवठ्याची सोय करण्यात आली होती तर संपूर्ण महाराष्ट्रात सोलापूर नंतर विदर्भातील एकमेव कामठी येथे 11 हेक्टर जागेत 750 घरकुलांची बिडी कामगारांसाठी घरकुल योजना यशस्वी करीत सुलेखाताईच्या अथक प्रयत्नातून कुंभारे कॉलोनी नामक बिडी वसाहत वसविण्यात आली मात्र ज्या राज्यमंत्रीच्या अथक प्रयनातून शहरात स्वतंत्र पाणी पुरवठा ची सोय करीत शहरातील पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यात आला त्याच सुलेखाताईच्या अथक प्रयत्नातून वसलेल्या बिडी कामगारांच्या वसाहत कुंभारे कॉलॉनीत अजूनही पाण्याचा ठणठणाट असून मागील काही महीण्यापासून कुंभारे कोलोणीच्या काही भागात तसेच आझाद नगर भागात पाण्यासाठी वणवण भटकंती करावे लागते ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल…तेव्हा पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी न लागल्यास कामठी नगर परिषद प्रशासन विरोधात तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल असा ईशारा समाजसेवक उदास बन्सोड यांच्या नेतृत्वात दिलेल्या सामूहिक निवेदनातून देण्यात आला.
निवेदन देताना शेखर कावळे, सुरज पिललेवान, अरविंद वाघमारे, सुनीता वाघमारे, विनोद डांगे, आकाश सोमकुवर, शैलेश खोब्रागडे, सुजाता खोब्रागडे, ईश्वर वासनिक, शंकर वासनिक, रोहित उके, हेमंत चवारे, प्रकाश लोणारे, आदित्य रंगारी, प्रवीण हाडके, प्रशांत हाडके, गणपत डोंगरे, पुष्पां वाघमारे, संगीता मांनवटकर, आशा मेश्राम, हेमलता शर्मा, वंदना बन्सोड, तारेश कांबळे आदी उपस्थित होते.