नागपूर :- रविवारी नागपूर येथे झालेल्या महाराष्ट्र शासनचे मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना स्थान न मिळाल्यामुळे ओबीसी समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने आणि निषेध व्यक्त करण्यात येत आहेत.ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे हा ओबीसी समाजाचा अपमान आहे.
युती सरकारने त्यांचा ओबीसी मतांसाठी वापर करून घेतला व मंत्रीपदाच्या यादीतून छगन भुजबळ यांना वगळण्यात आले. याची ओबीसी समाजात नाराजी पसरली आहे. छगन भुजबळ यांनीही आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना “जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना” असे सूचक वक्तव्य केले. नाशिकमध्ये आपल्या समर्थकांशी संवाद साधताना त्यांनी पक्षातील अवहेलनाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ओबीसी समाजातील काही नेत्यांनी भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून वेगळा विचार करावा, अशी मागणी केली आहे. त्यांच्या मते, भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे ओबीसी समाजाचा अपमान झाला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाजात असंतोषाचे वातावरण वाढत आहे. आणि भविष्यात या परिस्थितीचा राजकीय परिणाम होण्याची शक्यता आहे.