कांद्याला ३०० रु . अनुदान दिल्याबद्दल भाजपा किसान मोर्चाकडून शिंदे – फडणवीस सरकारचे अभिनंदन

मुंबई :-राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० रु. सानुग्रह अनुदान दिल्याबद्दल राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचे अभिनंदन करणारा ठराव भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या शुक्रवारी झालेल्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत मंजूर करण्यात आला. किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी खेडोपाडी जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील शेतकरी कल्याणाचे निर्णय बळीराजापर्यंत पोचवावेत, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या बैठकीत मार्गदर्शन करताना केले. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या या बैठकीला भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, किसान मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ शंभू कुमार, प्रदेश किसान मोर्चा उपाध्यक्ष आनंदराव राऊत, प्रदेश किसान मोर्चा प्रभारी बन्सीलाल गुज्जर, प्रदेश सरचिटणीस मकरंद कोरडे आदी उपस्थित होते.

बावनकुळे यांनी या बैठकीत बोलताना सांगितले की , केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारप्रमाणेच राज्यातील एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. हे निर्णय लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांची आहे. त्यासाठीची यंत्रणा किसान मोर्चाने तयार करायला हवी.

अवघ्या एक रुपयात पीक विमा देणारी योजना शिंदे – फडणवीस सरकारने तयार केली असून आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किसान समृद्धी योजनेच्या १२ हजार रु. व्यतिरिक्त ९ हजार रु. देण्यात येणार आहेत. या सर्व निर्णयांची माहिती विविध माध्यमांतून शेतकरी वर्गापर्यंत पोहचवणे आवश्यक आहे , असेही बावनकुळे यांनी नमूद केले.

किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या शेतकरी हिताच्या वेगवेगळया निर्णयांचा आढावा घेतला. इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेऊन तसेच साखर कारखान्यांच्या अनेक वर्षांचा आयकराचा प्रश्न मोदी सरकारने सोडविल्यामुळे साखर उद्योग आत्मनिर्भर झाला आहे, असे काळे यांनी नमूद केले.

शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारचेही या बैठकीत अभिनंदन करण्यात आले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com