महापुरुषांचा अवमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही; धनंजय मुंडेंचा इशारा
अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना धनंजय मुंडे फॉर्मात, स्वर्गीय अटलजींच्या काढल्या आठवणी
नागपुर :- आज देशात सत्तेत असलेल्या भाजपला एकेकाळी संपूर्ण बहुमताने सत्तेत यायला २०१४ पर्यंत प्रतिक्षा करावी लागली होती, आज जरी सत्तेत असले, काही काळ राहिले तरी एक ना एक दिवस सत्ता जात असते, प्रत्येकाचा दिवस येत असतो त्यामुळे आज सत्तेत असलेल्यांनी सत्तेचा दुरुपयोग करू नये. सत्तेच्या बळावर विरोधकांचा आवाज दाबण्याचा व विरोधकांवर अडीच वर्ष सत्तेबाहेर ठेवल्याचा सूड उगवू नये, विकासात्मक राजकारण करावे, असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.
विरोधी पक्षाच्यावतीने अंतिम आठवडा प्रस्तावाच्या निमित्ताने धनंजय मुंडे विधानसभेत बोलत होते. राज्यात सातत्याने सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून महापुरुषांची होत असलेली बदनामी याविषयी बोलताना धनंजय मुंडे आज पुन्हाएकदा पूर्वीच्या फॉर्मात दिसून आले.
राज्याच्या सार्वभौम सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज, संविधानकर्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, यासह मान्यवर महापुरुषांच्या, राष्ट्रनिर्मितीत योगदान असलेल्या नेत्यांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत. याची आठवण करून देत महापुरुषांच्या बाबतीत सातत्याने बेजबाबदार व बेताल वक्तव्य करणाऱ्या सत्ता पक्षातील नेत्यांचा धनंजय मुंडे यांनी चांगलाच समाचार घेतला.
राज्यात सत्तांतर झाल्यापासून सातत्याने विरोधी पक्षातल्या नेत्यांना टार्गेट करून बदनाम करणे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, त्यांना अडकवण्याचा ते अगदी त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा सातत्याने प्रयत्न होत असून, यापूर्वीचे राजकारण असे नव्हते, केवळ विरोधक आहे म्हणून एखाद्याला संपवायचा, उध्वस्त करायचा प्रयत्न करणे नैतिकतेच्या बाहेरचे आहे; असेही धनंजय मुंडे म्हणाले.
यावेळी त्यानी ज्येष्ठ नेते स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या ‘भ्रष्ट नितीने एखादा पक्ष संपवून जर सत्ता येत असेल तर अशा सत्तेला मी स्पर्श सुद्धा करणार नाही,’ या प्रसिद्ध ओळी हिंदीतून ऐकवल्या. विरोधी पक्षातील नेत्यांना संपवायचे राजकारण एकीकडे करत असताना दुसरीकडे सातत्याने महापुरुषांबद्दल होत असलेली वक्तव्ये थांबवावीत, अन्यथा अशी वक्तव्ये महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही, असेही धनंजय मुंडे यांनी सुनावले .
एखादा सर्वसामान्य माणूस किंवा विरोधी पक्षातला नेता जर प्रधानमंत्री बद्दल काही बोलला, तर त्याला थेट जेलमध्ये घातले जाते, मग सत्ता पक्षातील लोक जेव्हा युगपुरुषांबद्दल, महापुरुषांबद्दल चुकीचे व गैरवक्तव्ये करतात, तेव्हा तुम्हाला राग येत नाही का? अशा लोकांनाही सरकारने यापुढे जेलमध्ये घालावे, असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले.
तुम्ही जनतेच्या मनातले मग एवढी सुरक्षा घेऊन का फिरता?
राज्याचे मुख्यमंत्री नेहमी सांगतात की आम्ही जनतेच्या मनात असलेले सरकार स्थापन केले आहे, मग हे सरकार जनतेच्या मनातले आहे तर सत्ता पक्षातील आमदार व मंत्री स्वतःभोवती इतकी सुरक्षा घेऊन का फिरतात? जनतेच्या मनात आहात तर कोणाची भीती आहे, असा सवालही यानिमित्ताने धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.