राज्यात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यांमध्ये  – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

– आदर्श आचारसंहिता लागू

मुंबई :-  लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाव्दारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात दि.19 एप्रिल ते 20 मे, 2024 या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे.या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता आजपासून लागू झाली असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

मंत्रालय विधीमंडळ वार्ताहार संघ येथे लोकसभा निवडणूक 2024 बाबत माहिती देण्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक(माहिती) डॉ.राहूल तिडके, उपसचिव व सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना चोक्कलिंगम म्हणाले की, 18 व्या लोकसभेकरिता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिनांक 19 एप्रिल ते 1 जून 2024 या कालावधित एकूण सात टप्यांमध्ये मतदान पार पडणार असून 4 जून 2024 रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार मतदान

भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च, 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघासाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात विदर्भातील 05 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 19 एप्रिल, 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 20 मार्च, 2024 पासून सुरु होईल. दुसऱ्या टप्प्यात विदर्भ व मराठवाड्यातील 08 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 26 एप्रिल,2024 रोजी मतदान घेण्यात येणार असून यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 28 मार्च,2024 पासून सुरु होईल. तिसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणातील 11 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 07 मे,2024 रोजी मतदान घेण्यात येणार असून यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 12 एप्रिल,2024 पासून सुरु होईल. चौथ्या टप्प्यात खान्देश, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 13 मे,2024 रोजी मतदान घेण्यात येणार असून यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 18 एप्रिल,2024 पासून सुरु होईल. पाचव्या टप्प्यात खान्देश व कोकणातील 13 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 20 मे, 2024 रोजी मतदान घेण्यात येणार असून यामध्ये मुंबई व ठाण्यातील मतदारसंघांचा सुध्दा समावेश आहे. यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 26 एप्रिल, 2024 पासून सुरु होईल. मतमोजणी दिनांक 04 जून, 2024 रोजी होणार आहे.

30-अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक

महाराष्ट्र विधानसभेच्या 30-अकोला पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून सुध्दा दुस-या टप्प्यात पोट निवडणुक घेण्यात येणार आहेत. या पोट निवडणूकीचे मतदान दि.26 एप्रिल,2024रोजी होणार असून त्यासाठीची नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दि.28 मार्च,2024 रोजी पासून सुरु होईल.

आदर्श आचारसंहिता

भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असल्यामुळे संपूर्ण राज्यात आजपासून तत्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. सदर आचार संहिता लोकसभेचे नवीन सभागृह गठित होण्याबाबतची संविधानिक अधिसूचना जारी होईपर्यंत लागू राहील. त्यामुळे उपरोक्त कालावधीत स्वेच्छाधीन निधीतून अनुदानाचे वाटप, मंत्र्यांचे दौरे व शासकीय वाहनांचा वापर, एकत्रित निधीतून शासकीय जाहिराती प्रसिध्द करणे, नवीन कामांची किंवा नवीन योजनांची घोषणा करणे, शासकीय सार्वजनिक/खासगी संपत्तीचे विद्रुपीकरण इत्यादीं बाबींवर निर्बंध लागू झाले आहेत.

आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत निवडणूक खर्चावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. याकरीता राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उमेदवाराने नामनिर्देशन पत्र भरल्यापासून त्याच्या निवडणूक खर्चाची गणना सुरु करण्यात येईल. मात्र, नामनिर्देशन भरण्यापूर्वी निवडणूक प्रचारासाठीचे साहित्य खरेदी केलेले असल्यास व त्याचा वापर नामनिर्देशनानंतर केला गेल्यास त्या खर्चाचाही समावेश निवडणूक खर्चामध्ये करता येईल. लोकसभा निवडणुकीकरीता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा रु.95 लाख इतकी ठेवण्यात आलेली आहे. तसेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीकरिता प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा रु.40 लाख इतकी आहे.

राजकीय पक्षांच्या व उमेदवारांच्या जाहिराती प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee) स्थापन करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे या समितीकडून पेड न्यूज संदर्भातही प्राप्‍त होणा-या तक्रारींवर कार्यवाही करण्यात येते.

सर्व राजकीय पक्ष, प्रसिध्दी माध्यमे आणि शासकीय विभाग प्रमुख यांच्याबरोबर बैठका घेऊन त्यांना आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत राज्य व जिल्हास्तरावर माहिती देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी तसेच मतमोजणीच्या दिवशी मतदान केंद्र/मतमोजणी केंद्रावर प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेश मिळण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून प्राधिकार पत्रे सुध्दा निर्गमित करण्यात येणार आहे. मात्र त्या साठीच्या शिफारशी माहिती व जनसंपर्क संचालनालया मार्फत विहित मुदतीत व प्रपत्रात सादर करावयाच्या आहेत.

तसेच आदर्श आचारसंहितेच्या काळात राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी “काय करावे किंवा करु नये” (“DOs & DON’Ts) ची प्रत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच, या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मॅन्युअल/हस्तपुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याशिवाय भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ https://eci.gov.in वर निवडणुकी संदर्भातील सर्व सूचनांचा तपशील उपलब्ध आहे. तसेच उमेदवारांनी दाखल केलेली शपथपत्रे व खर्चाचे तपशील वेळोवेळी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वानाडोगरी की 58 विधवा महिलाओं को किया सम्मानित 

Sun Mar 17 , 2024
– महाजनवाडी में जागतिक महिला दिन पर हल्दी कुकु कार्यक्रम हिंगना :- जागतिक महिला दिवस के उपलक्ष वानाडोगरी नगर परिषद अंतर्गत महाजनवाडी के प्रभाग 10 स्थित हनुमान मंदिर परिसर में हल्दी कुंकु कार्यक्रम का आयोजन किया गया था। जिसमें क्षेत्र की विधवा महिलाओं, आंगनवाड़ी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, कोरोना योद्धा महिलाओं को शाल श्रीफल, पुष्पगुच्छ, भेट वस्तु देकर सम्मानित किया […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com