– नागपूर सुधार प्रन्यासशी संबंधित विषयांवरील निवेदने स्वीकारणार
नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम येत्या १८ ऑगस्टला सिव्हिल लाइन्स येथील स्व. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मंत्री महोदय फक्त नागपूर सुधार प्रन्यासशी (एनआयटी) संबंधित विषयांवरील निवेदने स्वीकारणार आहेत.
१८ ऑगस्टला सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत ना. गडकरी सिव्हिल लाइन्स येथील स्व. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात उपस्थित राहतील. यावेळी ते एनआयटीशी संबंधित समस्यांची सुनावणी करतील. नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती व इतर अधिकारी जनसंपर्क कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी आपल्या समस्या या जनसंपर्क कार्यक्रमामध्ये मांडाव्यात, असे आवाहन एनआयटीतर्फे देखील करण्यात आले आहे.
निवेदनाच्या तीन प्रती आणाव्यात
जनसंपर्काला होणारी गर्दी लक्षात घेता, नागरिकांची निवेदने स्वीकारण्यासाठी देशपांडे सभागृहाच्या परिसरात काउंटर लावले जातील. या काउंटरवरून नागरिकांना टोकन नंबर दिले जातील. जनसंपर्काला येणाऱ्या नागरिकांनी स्वतःची निवेदने सुवाच्य अक्षरात लिहून आवश्यक त्या कागदपत्रांसह आणावीत. तसेच निवेदनाच्या तीन प्रती सोबत आणाव्यात, असे आवाहन गडकरी यांच्या कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.