नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) आजी-माजी कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला. एलआयसी परिवाराच्या वतीने रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात स्नेहमिलन आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला निलेश साठे, दीपक मोघे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
‘गेल्या दहा वर्षांपासून मी तुमच्या आशीर्वादाने नागपूरचा खासदार आहे. मी निवडून आल्यानंतर केंद्रात मंत्रीपद मिळाले. त्यानंतर गेल्या दहा वर्षांमध्ये १ लाख कोटींची कामे नागपुरात करता आली. त्यासोबतच देशाच्या कानाकोपऱ्यातही अनेक कामे करता आली. महामार्गांचे जाळे विणता आले. सात विश्वविक्रम माझ्या विभागाने केले. लोकांचे खूप प्रेम मिळाले. आज सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात लोक मला फॉलो करतात, याचा खूप आनंद,’ अशा भावना ना. गडकरी यांनी व्यक्त केल्या.
‘यंदाच्या निवडणुकीतही आपण सारे माझ्या सोबत आहात. पण, तरीही नागपुरात ७५ टक्के मतदान होणे आवश्यक आहे. आपण एक सजग नागरिक म्हणून त्यासाठी जनजागृती करावी,’ असे आवाहनही ना. गडकरी यांनी केले. ७५ टक्के मतदान झाले तर मी नक्कीच मोठ्या फरकाने विजय मिळवेन, असा विश्वासही ना.गडकरी यांनी व्यक्त केला. नागपूर हा माझा परिवार आहे. जात-पात-धर्माच्या पलीकडे जाऊन काम केले. त्यामुळे मला सर्वांचेच सहकार्य मिळाले, या शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.