शिवप्रेमींच्या ‘शिवजागरा’ने दुमदुमली राजधानी दिल्ली!

– महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभागाचा ‘शिवजागर : साद सह्याद्रीची’ सोहळा संपन्न

– महाराष्ट्राची लोकधारा आणि शिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रेक्षकांची भरभरून दाद

नवी दिल्ली :- देशाची राजधानी नवी दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त ‘शिवजागर : साद सह्याद्रीची’ हा विशेष कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सुमारे २०० कलाकारांनी सादर केलेल्या भव्य सादरीकरणास उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

नवी दिल्लीतील सिरी फोर्ट सभागृह येथे हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले होते तर विवेक व्यासपीठातर्फे या कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे अपर सचिव आनंद पाटील तसेच नवी दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियलचे कर्नल (नि.) मोहन काकतीकर यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहाय्यक संचालक संदीप शेंडे, विवेक व्यासपीठाचे निमेश वहाळकर आणि कृष्णात कदम व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचा प्रारंभ महाराष्ट्र राज्यगीताने झाला. यावेळी कर्नल (नि.) मोहन काकतीकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्ष कार्यक्रमाचे नवी दिल्लीत आयोजन होणे हे गौरवाचे आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामुळेच आजचा भारत समर्थपणे उभा आहे. मुघल औरंगजेबाचा पराभव करून मराठ्यांनी शिवरायांच्या प्रेरणेने अटकपर्यंत आपले साम्राज्य निर्माण केले होते. ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची आहे, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे अपर सचिव आनंद पाटील म्हणाले की, संघर्ष करणे हा मराठी माणसाचा स्थायीभाव आहे. मराठी माणसाला ही प्रेरणा मिळते ते छत्रपती शिवाजी महाराजांकडून. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्या काळात क्रांती घडवली होती. त्यांनी मुघलांशी अविरत संघर्ष केला, अगदी औरंगजेबाच्या कैदेतही त्यांना राहावे लागले. मात्र, त्यानंतर त्यांनी नव्या युगाचा प्रारंभ केला. शिवाजी महाराजांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठीदेखील प्रेरणा दिली होती. शिवरायांना घडवले ते जिजाऊमातांनी. हिंदवी स्वराज्याची संकल्पना त्यांच्याच मनात आली आणि त्यांनी ती शिवाजी महाराजांच्या मनात ती संकल्पना उतरवून ती प्रत्यक्षातही उतरवून दाखवली. त्यामुळेच शिवचरित्र आजही मार्गदर्शक असल्याचे आनंद पाटील यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात गीतगायन, नृत्य, सामूहिक नृत्य, पोवाडा व लोककला सादरीकरण, चित्रकला, रांगोळी, शिवकालीन साहसी क्रीडाप्रकारांचे सादरीकरण अशा विविध प्रकारच्या कलात्मक सादरीकरणाचा सहभाग होता. तब्बल २०० कलाकार या सादरीकरणात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोकसंस्कृती, लोप पावत चाललेल्या अनेक लोककलांचे दर्शन ‘महाराष्ट्राची लोकसंस्कृती’ या भागातून घडवण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा भव्य प्रसंग ‘शिवपर्व’ या भागातून मांडला गेला. अमित घरत यांनी या संपूर्ण कला सादरीकरणाचे नृत्य दिग्दर्शन केले. या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

कार्यक्रमास दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिसरातील मराठी जनांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. दिल्लीतील विविध मराठी संस्था-संघटनांचे सदस्य – पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते. त्याचप्रमाणे नूतन मराठी विद्यालयासह अन्य शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थीही उपस्थित होते. यावेळी देशाच्या राजधानीत शिवछत्रपतींचे कार्य नेमकेपणाने मांडल्याबद्दल विद्यार्थी व त्यांच्या पालकांनीदेखील समाधान व्यक्त केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सर्वांगिण विकासात नागपूर अग्रेसर : ना. नितीन गडकरी

Sun Mar 10 , 2024
– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उत्तर नागपुरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण नागपूर :- नागपूर शहरात सर्वत्र चौफेर विकास कामे सुरु आहेत. भौतिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक या सर्वच क्षेत्रात नागपूरची प्रगतीकडे वाटचाल सुरु आहे. शहराच्या या सर्वांगिण विकासात प्रत्येक भागाचे योगदान मोठे आहे. विकासाच्या या श्रृंखलेत यापुढे उत्तर नागपूर नेहमीच अग्रेसर राहील, असा विश्वास केंद्रीय मंत्री  नितीन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com