नागपूर, ता. 23 : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता. 22) रोजी 04 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. गांधीबाग झोन अंतर्गत इतवारी मार्केट येथील ममता किराणा स्टोअर्स या दुकानांविरूध्द प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल केला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत नेहरु पुतला मार्केट इतवारी मार्केट येथील नारायणजी एजन्सी या दुकानाविरूध्द प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसुल केला.
त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत टेम्पल बाजार रोड, सिताबर्डी येथील विजय रेस्टॉरेन्ट यांच्याविरुध्द रेस्टॉरंटचा कचरा रस्त्यालगत पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल केला. धंतोली झोन अंतर्गत बालाजीनगर येथील आकाश रेसिडेन्सी यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरवून ठेवल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसुल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.