नितीन गडकरी यांनी जोशपूर्ण वातावरणात दाखल केला उमेदवारी अर्ज

– मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती : संविधान चौकातून निघालेल्या रॅलीत हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग

नागपूर :- नागपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी जोशपूर्ण वातावरणात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती.

सुरुवातीला संविधान चौकात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला ना. नितीन गडकरी यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी रामटेक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्यासह सर्व नेते मंडळी उपस्थित होती. संविधान चौकात हजारो कार्यकर्ते चारही बाजुंनी एकत्र आले आणि त्यांच्या साक्षीने अतिशय उत्साहात रॅलीला प्रारंभ झाला. ‘कहो दिल से… नितीनजी फिर से’, ‘नागपूर का खासदार कैसा हो… नितीन गडकरी जैसा हो’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा आदी क्षेत्रांमधील संघटनांनी ना. नितीन गडकरी यांचे ठिकठिकाणी स्वागत करून शुभेच्छा दिल्या. रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात युवा व महिला कार्यकर्त्यांचा समावेश होता. नागपूर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण विदर्भातील कार्यकर्त्यांनी ना. गडकरी यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. महायुतीमधील सर्व पक्षांचे कार्यकर्ते ना. गडकरी यांच्या समर्थनार्थ रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

आकाशवाणी चौकातील सभेने संचारला उत्साह

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचण्यापूर्वी आकाशवाणी चौकात सभा आयोजित करण्यात आली. या सभेने कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारला होता. महिलांनी फुगडी खेळून तर युवकांनी गाण्यांच्या तालावर ठेका धरून आनंद व्यक्त केला. या सभेला खासदार कृपाल तुमाने, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, आमदार आशीष जयस्वाल, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, भाजपचे ज्येष्ठ नेते संजय भेंडे आदींची उपस्थिती होती. प्रफुल्ल पटेल यांनी नितीन गडकरी हे नागपूरचे नव्हे तर देशाचे वैभव असल्याचे गौरवोद्गार काढले. रामटेक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजू पारवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी काम करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यकर्ते देतात लढण्याची ऊर्जा – ना. नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी रॅलीमध्ये उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि विविध संघटनांचे आभार मानले आणि माझे कार्यकर्तेच मला लढण्याची ऊर्जा देतात, अशा भावना व्यक्त केल्या. ‘गेल्या दहा वर्षांमध्ये १ लाख कोटी रुपयांची कामे नागपूर लोकसभा मतदारसंघात झालीत. पण या कामांचे श्रेय माझे किंवा देवेंद्रचे नसून हजारो कार्यकर्त्यांचे आहे. कारण कार्यकर्त्यांनी विश्वास दाखवला नसता तर हे शक्य झाले नसते,’ असेही ते म्हणाले. निवडणुकीत विजय निश्चित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाला विश्वगुरू होण्याचे, सर्वांगीण विकास साधण्याचे आणि सुखी भारताची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचे मिशन गाठायचे आहे. आपले सरकार पुन्हा येईल आणि विकासात ‘चार चाँद’ लागतील, असा विश्वासही ना. गडकरी यांनी व्यक्त केला.

नितीन गडकरी विक्रम प्रस्थापित करतील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा नितीन गडकरी रेकॉर्डब्रेक मते मिळवून विक्रम प्रस्थापित करतील. त्यांनी नागपूरसह संपूर्ण देशाची सेवा करताना समाजातील सर्व घटकांना सामावून घेतले. त्यामुळे त्यांचा विजय अभूतपूर्व असणार आहे, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘नितीन गडकरी गेल्या दहा वर्षांमध्ये जे काम केले आहे, तो केवळ ट्रेलर आहे. पुढील पाच वर्षांत महाराष्ट्र आणि देश आणखी बदललेला असेल.’ या निवडणुकीत विरोधकांचे बारा वाजविल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Maharashtra Governor inaugurates International Logistics event 'LOGIX India' in Mumbai

Wed Mar 27 , 2024
Mumbai :- Maharashtra Governor Ramesh Bais inaugurated the 5th edition of LOGIX INDIA 2024, the international flagship logistics event in Mumbai on Tue (26 Mar). The 3 -day exhibition and buyer – seller Meet LOGIX India has been organised by the Federation of Indian Export Organisations (FIEO). Complimenting FIEO for promoting India’s exports for the last six decades, the Governor […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights