मुंबई :- राज्यातील वीज निर्मिती सुधारण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून टप्प्याटप्प्याने नवीन प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. तसेच भविष्यात वीज पुरवठा अधिक सक्षम केला जाईल, असे ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
राज्यात महानिर्मितीचे पाच संच बंद असल्याने विजेचा तुटवडा निर्माण होत असल्याबद्दल सदस्य मनिषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर बोलत होत्या.
राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले की, वीज निर्मिती संच बंद असण्याची ही पहिली वेळ नसून नियमित देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी काही संच बंद ठेवावे लागतात तसेच तांत्रिक बिघाडांमुळे काही संच बंद राहतात.
प्लान्ट लोड फॅक्टर (PLF) बाबत महाराष्ट्राचा दर हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च दर आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार 2030 पर्यंत काही जुने प्रकल्प चालू ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे सरकार आणि खासगी वीज निर्मिती कंपन्यांची तुलना योग्य नाही, असे त्यांनी सांगितले.
राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी स्पष्ट केले की, जानेवारी महिन्यात 82.5 दशलक्ष युनिट वीज खरेदी करण्यात आली असून तिचा दर 3.31 रुपये प्रति युनिट होता. हा दर खासगी कंपन्यांच्या तुलनेत अधिक नव्हता. तसेच, सरकारकडील जुने वीज प्रकल्प टप्प्याटप्प्याने नव्या तंत्रज्ञानाने अद्ययावत केले जात आहेत. भुसावळ येथे 660 मेगावॅटचा नवीन प्रकल्प कार्यान्वित होत असून, चंद्रपूरमध्ये 800 मेगावॅटचा प्रकल्प प्रगतीपथावर असल्याचे राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.