लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज – नाना पटोले

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

– भाजपा सरकारमुळे सीमेवरील जवान व शेतात राबणारा शेतकरीही असुरक्षित.

– भंडारा-गोंदियाचे उमेदवार डॉ. प्रशांत पाडोळे, चंद्रपूरमधून आ. प्रतिभा धानोरकर, गडचिरोली-चिमूर मधून डॉ. नामदेव किरसान व रामटेकमधून रश्मी बर्वे यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज

मुंबई :- लोकसभा निवडणूक देशासाठी अत्यंत महत्वाची आहे. मागील १० वर्षात भारतीय जनता पक्षाने देश बरबाद केला आहे. २०१९ च्या निवडणुकीवेळी पुलवामा येथे ४० जवान शहीद झाले परंतु या स्फोटाचा तपास अजून लागलेला नाही. या स्फोटासाठी वापरण्यात आलेली स्फोटके नागपूरहून पाठवल्याच्या बातम्याही आल्या पण पाच वर्ष झाली अजून या स्फोटामागे कोण होते, याचा शोध लागला नाही. भाजपा सरकारच्या काळात देशातील सैनिक सुरक्षित नाही आणि शेतकरीही सुरक्षित नाहीत असा हल्लाबोल करत लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. प्रशांत पाडोळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी नाना पटोले बोलत होते, ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदींनी २०१४ साली जनतेला भरमसाठ आश्वासने दिली, सत्तेत आल्यानंतर महागाई कमी करू, दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देऊ, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करु, शेतमालाला दिडपट भाव देऊ, परदेशातील काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करू परंतु यातील एकही आश्वासन मोदींनी पूर्ण केले नाही. उलट जीएसटीच्या माध्यामातून जनतेला १० वर्ष लुटले आहे. शेतकऱ्याच्या शेतात वीज नाही, पण शौचालयावर मोदीचा फोटो, खताच्या पिशवीवर मोदीचा फोटो झळकतो. १० वर्षात मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी काहीच केले नाही आणि आता पुन्हा मोदींच्या नावाने मते मागत आहेत. भाजपाचे नेते मतं मागायला आल्यावर, १० वर्षात त्यांनी काय काम केले, याचा जाब विचारा.

खासदार राहुल गांधी यांनी पदयात्रा काढून इतिहास रचला आहे. कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमीटर व आता मणिपूर ते मुंबई ६७०० किलोमीटरची यात्रा काढली. या यात्रेतून त्यांनी गरीब, वंचित, शेतकरी, महिला, तरुण, कामगार यांचे दुःख समजून घेतले व २५ गॅरंटी दिल्या आहेत. प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेसचे सरकार आल्यानंतर पहिली सही शेतकरी कर्जमाफीवर करण्याचे आश्वासन दिले आहे. गरीब महिलांना दर वर्षाला १ लाख रुपये, तरुणांना प्रशिक्षणाची गॅरंटी, ३० लाख सरकारी रिक्त पदे भरणार तसेच पेपरफुटीला लगाम घालणारा कायदा आणला जाईल अशी आश्वासने दिलेली आहेत. डॉ. प्रशांत पडोळे यांना विक्रमी मतांनी निवडून द्या, असे आवाहनही नाना पटोले यांनी केले आहे.

यावेळी माजी मंत्री सतिश चतुर्वेदी, अनिस अहमद, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आ. वजाहत मिर्झा, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व इंडिया आघाडीतील मित्रपक्षांचे नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रामटेक लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचाही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. माजी मंत्री सुनील केदार, नागपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रविंद्र मुळक, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज दाखल केला.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रतिभा सुरेश धानोरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी आ. अभिजीत वंजारी यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे पहायला मिळाले.

गडचिरोली-चिमूर मतदार संघातून इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्षांचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारतीय जनता पार्टीतर्फे 21 हजार ' नमो संवाद' सभांचे आयोजन

Wed Mar 27 , 2024
– भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांची माहिती मुंबई :- भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यात स्टार प्रचारकांच्या सभांबरोबरच पक्ष संघटनेच्या शक्ती केंद्र पातळीवरील 21 हजार ‘नमो संवाद’ सभांचे आयोजन केले जाणार आहे. ‘नमो संवाद’ सभांच्या माध्यमातून भाजपा चे 1 कोटी मतदारांपर्यत पोहोचण्याचे लक्ष्य आहे, अशी माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी बुधवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com