नागपूर :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील आदिवासीबहुल जिल्ह्यात माहिती, शिक्षण आणि संवादासाठी सुरु झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा प्रारंभ नंदूरबार येथील राज्यस्तरीय जनजातीय गौरव दिनात राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. त्यानुषंगाने जिल्ह्यात या यात्रेचा प्रारंभ नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील सात आदिवासीबहुल गावात होणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेच्या नियोजनाबाबत बैठकीत ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, मनपाचे अधिकारी व इतर विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती या यात्रेदरम्यान देण्यात येणार आहे. सर्व विभागानी आपल्या विभागाच्या योजनांची माहिती यात्रेदरम्यान ग्रामस्थांना द्यावी, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. त्यासोबत आदिवासी विभागांनी त्यांच्या विभागाच्या योजनेच्या माहितीसोबत लाभार्थ्याना आमंत्रित करावे.
नुकताच भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंड राज्यातील उलिहातू येथून करण्यात आले. वंचित समुदायासाठी विविध शासकीय योजना आहेत. या योजनांची जनजागृतीचे ध्येय या विकसित भारत संकल्प यात्रेतून साध्य होणार आहे.
आदिवासी बांधवांचा गौरव वाढवतानाच त्यांच्या विकासासाठी या अभियानाच्या रुपाने आणखी एक पाऊल पुढे टाकले जात आहे. या यात्रेदरम्यान केंद्र व शासनाच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा, उज्ज्वला, मुद्रा, किसान सन्मान, पोषण,जनधन योजनेसह वनहक्क, महसूल विभागाची स्वामित्व योजना, एकलव्य योजना, मेरी कहानी मेरी जुबानी, आयुष्मान कार्डची माहिती देण्यात येणार आहे. शिक्षण विभागाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम, निबंध स्पर्धेचे तर क्रीडा विभागाच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हास्तराप्रमाणे पंचायतस्तरावर बैठकीचे आयोजन करावे. संबंधित ग्रामसेवकांना नोडल अधिकारी नेमावे, असेही ते म्हणाले.