मुंबई :- पर्यावरणाच्या संवर्धनातूनच जगातील सर्व देशांचा सर्वंकष विकास साधला जाईल. सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘लाईफ फॉर एन्व्हायर्न्मेंट’ संकल्पना मांडली आहे. ही संकल्पना आत्मसात करुनच शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करु शकतो, असे प्रतिपादन नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वरन अय्यर यांनी आज येथे केले.
बांद्रा येथील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर येथे जी २० परिषदेच्या विकास कार्य गट (डेव्हलपमेंट वर्किंग ग्रुप) च्या बैठकीच्या आजच्या दुसऱ्या चर्चा सत्रातील इन्फुसिंग न्यू लाईफ इनटू ग्रीन डेव्हलपमेंट परिसंवादात माहिती देताना ते बोलत होते. अय्यर यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे सादरीकरण केले.
अय्यर यांनी सांगितले की, सर्वांनी एकत्र येऊन वातावरणीय बदल टाळण्यासाठी पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे गरजेचे आहे. पाण्याचा अनिर्बंध वापर टाळणे, विजेचा आवश्यक तेवढाच वापर करणे, अन्न वाया न घालवणे, इंधनाच्या बचतीची सवय लावून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अशा वैयक्तिक, सामाजिक तसेच देशासाठी पर्यावरणपूरक सवयी लावून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
पर्यावरणपूरक वस्तू तयार करणे आणि त्याचा प्रमाणित वापर व्हावा, यासाठी प्रत्येकाने जबाबदार नागरिक म्हणून पर्यावरणपूरक सवयी शाश्वत विकास करण्यासाठी आवश्यक आहे. पर्यावरणपूरक उत्पादन सहज आणि किफायतशीर दरात उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक ते बदल घडवून आणायला हवेत, असेही त्यांनी सांगितले.