अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील पदव्यूत्तर गणित विभागात राष्ट्रीय गणित दिवस नुकताच साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.एस.व्ही. डुडुल, तर प्रमुख वक्ते म्हणून श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचे गणित विभागप्रमुख डॉ.व्ही.ए. ठाकरे व विद्यापीठ गणित विभागप्रमुख डॉ.एस.एस. शेरेकर उपस्थित होते. प्रमुख वक्ते डॉ.व्ही.ए. ठाकरे यांनी ‘पॉप्युलर मॅथेमॅटिक्स’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करुन गणित विषयात संशोधनाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. डॉ.एस.एस. शेरेकर यांनी याप्रसंगी थोर गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचे गणितातील योगदानाबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात अधिष्ठाता डॉ.एस.व्ही. डुडूल यांनी गणिताचे समाजात असलेले महत्वाचे स्थान विद्याथ्र्यांना पटवून दिले. तसेच गणित दिवसाच्या निमित्ताने गणिताचा अभ्यास करतांना समर्पण हे खूप महत्वाचे असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.
विद्यापीठ गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक ए.आय. देठे, संचालन हुमेरा शेख हिने, तर आभार मोहिनी जाधव हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता एस.डी. रामटेके, ए.पी. निळे, डी.पी. राठोड, के.पी. काळे, बी.डी. देशमुख, ए.एस. रौंदळे, एस.ए.ए. कादिर व मनीष देशमुख यांनी अथक परिश्रम घेतलेत.