– महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस प्रमुख पाहुणे म्हणून राहणार उपस्थित
नागपूर :- राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी , नागपूर येथे 16 नोव्हेंबर 2023 ला भारतीय महसूल सेवेच्या 77 व्या तुकडीमधील 90 अधिकाऱ्यांच्या तसेच रॉयल भूतान सेवेतील 02 अधिकाऱ्यांच्या सेवापुर्व प्रशिक्षणाचे उद्घाटन होणार असून महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी , नागपूर ही केंद्र शासनाच्या भारतीय महसूल सेवा (आयकर) अधिकाऱ्यांसाठी सर्वोच्च प्रशिक्षण संस्था आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग द्वारे आयोजित नागरी सेवा परीक्षा द्वारे या आयआरएस अधिकाऱ्यांची भरती केली जाते. हे अधिकारी फील्ड ऑफिसमध्ये नियुक्त होण्यापूर्वी सुमारे 16 महिन्यांचे सेवापुर्व प्रशिक्षणाचे घेतात. त्यांच्या प्रशिक्षणादरम्यान, अधिकारी प्रशिक्षणार्थींना कर प्रशासनाच्या विविध पैलूंवर प्रशिक्षित केले जाते . त्यांना प्राप्तिकर कायद्यांमध्ये तसेच न्यायशास्त्र आणि व्यवसाय कायदे यामध्ये विशेष प्रशिक्षण दिले जाते.
अधिकारी प्रशिक्षणार्थींना खाती आणि लेखा प्रणालीवर सखोल प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणार्थींना करचोरी आणि मनी लाँड्रिंगसह कर प्रकरणे आणि आर्थिक गुन्ह्यांमध्ये तपासासाठी तयार करण्यासाठी फायनान्शियल फॉरेन्सिक्स आणि सायबर फॉरेन्सिक्समधील प्रशिक्षण देखील दिले जातात. प्रशिक्षणाच्या व्यावहारिक बाबींमध्ये आयकर विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांशी तसेच संसद, रिझर्व बँक ऑफ इंडीया , एनएसडीएल यासह भारतातील विविध संवैधानिक/वैधानिक संस्थांशी या अधिका-यांची संलग्नता समाविष्ट आहे.
सेवापुर्व प्रशिक्षण घेणा-या या आयआरएसच्या 77 व्या तुकडीत 90 अधिकारी प्रशिक्षणार्थींमध्ये 35 महिला (39%) अधिकारी प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. 23% अधिकारी प्रशिक्षणार्थी ग्रामीण पार्श्वभूमीचे आहेत आणि उर्वरित शहरी किंवा निमशहरी पार्श्वभूमीतील आहेत. सुमारे 2/3 अधिकारी प्रशिक्षणार्थी अभियांत्रिकी पार्श्वभूमीचे आहेत.
प्रशिक्षणार्थींना कर अधिकारी म्हणून काम करण्यासाठी आणि दर्जेदार करदाता सेवा देण्यासाठी हे प्रशिक्षण आवश्यक ज्ञान आणि कौशल्य यांनी सुसज्ज करते. हे सेवापुर्व प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर, अधिकारी प्रशिक्षणार्थींना भारतभरातील प्राप्तिकर कार्यालयांमध्ये सहाय्यक आयकर आयुक्त म्हणून नियुक्त केले जाते.