– जानेवारी महिन्यात ग्राहकांनी भरले 15.14 कोटी
नागपूर :- वीज बिल भरणे सोयीचे करणाऱ्या, तसेच छोट्या व्यावसायिकांना उत्पन्न मिळवून देणाऱ्या महावितरणच्या ‘महापॉवर-पे’ पेमेंट वॉलेटला नागपूर जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी पसंती दिली आहे. जानेवारी महिन्यांत दोन हजार 382 वीज ग्राहकांनी या वॉलेटच्या माध्यमातून 15 कोटी 14 लाख 94 हजार रुपयांच्या वीज बिलांचा भरणा केला आहे.
महावितरणच्या या सुविधेमुळे जिल्ह्यातील 129 वॉलेटधारकांना जानेवारी महिन्यात 11 हजार 910 रुपयांचे कमिशन देण्यात आले. यात नागपूर शहर मंडलातील 74 तर नागपूर ग्रामिण मंडलातील 55 वॉलेटधारकांचा समावेश आहे. त्यापैकी बुटीबोरी विभागातील 4. सिव्हील लाईन्स. कॉग्रेसनगर आणि काटोल विभागातील प्रत्येकी 11, गांधीबाग विभागातील 22, महाल विभागातील 26, मौदा विभागातील 13, सावनेर विभागातील 15 तर उमरेड विभागातील 16 वॉलेटधारकांचा समावेश आहे
ग्राहकांना वीज बिल भरणे अधिक सुलभ व्हावे यासाठी महावितरणने ‘महापॉवर-पे’ पेमेंट वॉलेट सुरू केले आहे. वयाच्या 18 वर्षावरील कोणीही व्यक्ती, तसेच छोटे व्यावसायिक, किराणा, मेडिकल, जनरल स्टोअर्स दुकानदार, बचत गट, विद्यार्थी, महावितरणचे वीज बिल वाटप एजन्सी व मीटर वाचन करणाऱ्या संस्था वॉलेटधारक होऊ शकतात. हे वॉलेट मोबाइल किंवा संगणकाद्वारे वापरले जाते आणि डेबिट, क्रेडिट कार्ड व नेटबँकिंगने रिचार्जची ऑनलाइन सोय आहे. वीज बिल भरण्यासाठी वॉलेटधारकास प्रतिपावती पाच रुपये कमिशन देण्यात येत आहे. आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या अर्जाची पडताळणी करून ‘महापॉवर-पे’ वॉलेटधारक म्हणून मंजुरी दिली जाते. त्यानंतर महावितरणच्या ग्राहकांकडून वीज बिलाचा भरणा करून घेता येतो
वॉलेटधारक महावितरणच्या ॲपमध्ये नोंदणी करून महावितरणच्या ग्राहकांकडून वीजबिलाचा भरणा करून घेऊ शकतील. वॉलेटमध्ये बिलाचा भरणा झाल्यानंतर संबंधित ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर बिल भरणा झाल्याचा एसएमएस तत्काळ मिळणार असल्याने ग्राहकांचे जागेवर समाधान होऊ शकेल. एकाच वॉलेटचा बॅलन्स वापरून विविध लॉग-ईनद्वारे वेगवेगळ्या व्यक्तींकडून वीजबिलाचा भरणा करून घेण्याची सुविधा वॉलेटमध्ये देण्यात आली असून याचा लेखाजोखा व कमिशन महिनाअखेर मुख्य वॉलेटमध्ये जमा केले जाईल.
रोजगाराची संधी
कोणतीही सज्ञान व्यक्ती, दुकानदार, व्यापारी, वीज मीटर रीडिंग करणारी संस्था, महिला बचत गट, लघूद्योजक महावितरणचे वॉलेटधारक होऊ शकतात. या वॉलेटच्या माध्यमातून या सर्वांना महावितरणच्या ऊर्जा संकलन प्रणालीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी ही प्री-पेड आधारित संकलन यंत्रणा आहे. वॉलेटधारकास प्रती बिलामागे 5 रुपये कमिशन मिळत असून महिना अखेरीस ते वॉलेटमध्ये जमा येते. महावितरण पेमेंट वॉलेटमुळे ग्रामीण भागात युवकांना रोजगाराची संधी मिळणार असल्याने शहरी व ग्रामीण भागातील अधिकाधिक पतसंस्था, दुकानदार यांनी वॉलेटधारक होण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.