– शंभर मिलीमिटर पाऊस पडल्यानंतरच पेरणीला सुरुवात करावी.
– बियाणांचे विशिष्ट वानासाठी आग्रह नको
– कापसाचे 20 लाख 89 हजार बियाणे पॉकेट उपलब्ध
नागपूर :- खरिप हंगामासाठी खते व बियाणांच्या पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी शंभर मिलीमिटर पाऊस पडेपर्यंत पेरणीला सुरुवात करु नये विभागात सोयाबीन, कापूस, तूर आदी बियाण्यांना मागणी असून 20 लाख 89 हजार 788 संकरीत कापूस पॅकेट व सोयाबीनचे 1 लाख 40 हजार 364 क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली.
खरिप हंगामासाठी पुरेशी खतांची उपलब्धता आहे. विभागासाठी 6 लाख 40 हजार 100 मेट्रीक टन विविध खतांचे आवंटन मंजुर झाले असून 4 लाख 35 हजार 399 मेट्रीक टन खतांची उपलब्धता आहे. त्यापैकी 36 हजार 640 मेट्रीक टन खतांची विक्री झाली असून 3 लाख 98 हजार 759 मेट्रिक टन साठा म्हणजेच 152 टक्के खतांचा साठा विभागासाठी उपलब्ध आहे. अशी माहिती कृषी सहसंचालक शंकर तोटावार यांनी यावेळी दिली.
खरिप हंगामासाठी नागपूर विभागात 3 लक्ष हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच कापूस पिकाखाली 6 लक्ष 50 हजार हेक्टर क्षेत्र, तूर पिकाखाली 1 लक्ष 88 हजार, भात पिकाखाली 8 लक्ष 50 हजार क्षेत्राचा समावेश आहे. विभागात एकूण पिकाखाली 20 लक्ष 37 हजार हेक्टर तर इतर पिकाखाली 21 हजार हेक्टर क्षेत्रात खरिप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार बियाणे व खतांच्या पुरवठ्याबाबत नियोजन करण्यात आले आहे.
खरिप पेरणी करतांना शेतकऱ्यांनी स्वत:जवळील बियाणांचा वापर करावा. यासाठी बियाणांची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी, पेरणीसाठी आवश्यक असलेले बियाणे अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावे खरेदी केलेल्या बियाणांची पावती घेऊन बियाणाचे पॅकेट सुरक्षित ठेवावे असे आवाहन कृषी सहसंचालक शंकर तोटावार यांनी केले आहे.