राजभवन येथील हवामान केंद्राचे राज्यपालांच्या हस्ते उदघाटन

हवामान केंद्र मुंबईतील तापमान, प्रदुषण, हवेची गुणवत्ता, आर्द्रता, सौर विकिरण, अतिनील किरणे आदी अचूक माहिती देणार

मुंबई :-सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क व आयआयटी मुंबई यांच्या सहकार्याने राजभवन येथे एक सौर उर्जेवर चालणारे हवामान केंद्र स्थापित करण्यात आले असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी (दि. ३१) प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. 

हवामान केंद्राच्या माध्यमातून मुंबईतील तापमान, प्रदूषण, हवेची गुणवत्ता, आर्द्रता, सौर विकिरण, अतिनील किरणे, कार्बन डाय ऑक्साईडची पातळी आदी विषयक अचूक माहिती जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून पाहता येणार आहे. या हवामान केंद्रामुळे मुंबई हवामानाच्या दृष्टीने जागतिक नकाशावर जोडले जाणार असून ‘वेदर अंडरग्राउंड’ या जागतिक हवामान विषयक संस्थेच्या संकेतस्थळाशी जोडले जाणार आहे. 

जागतिक हवामान बदल हे गंभीर आव्हान असून विद्यापीठे, शिक्षक व संशोधक यांनी या विषयावर निकडीने काम केले पाहिजे असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

हवामान केंद्र स्थापना सोहळ्याला सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क येथील भारत-अमेरिका अभ्यास केंद्राच्या संचालिका प्राध्यापिका पारोमिता सेन, प्राध्यापक निल फिलिप, प्राध्यापक ब्रायन वॉन हल, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु उज्वला चक्रदेव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु कारभारी काळे तसेच तसेच सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क येथील विज्ञान, तंत्रज्ञान व पब्लिक पॉलिसी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते.     

भारतात अश्या प्रकारची ६ हवामान केंद्रे ओरिसा, तेलंगणा, आंध्र प्रदेश व इतर राज्यात यापूर्वीच स्थापन करण्यात आली असून लवकरच एसएनडीटी महिला विद्यापीठ जुहू परिसर तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात देखील हवामान केंद्र स्थापन केले जाणार असल्याचे प्रा. पारोमिता सेन यांनी यावेळी सांगितले. 

अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाउंडेशनने सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कला दिलेल्या आर्थिक सहकार्यातून हे केंद्र स्थापन करण्यात आले असून केंद्राच्या माध्यमातून मिळालेली हवामानासंबंधी माहिती राजभवनाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी अनुभव कथन केले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com