नागपूर :- जी-20 परिषदेंतर्गत शहरात होऊ घातेल्या सी-20 परिषदेसाठी सौंदर्यीकरणाच्या कामाला गती प्राप्त झाली आहे. अजनी चौक ते रहाटे कॉलनी चौकादरम्यान वैविद्यपूर्ण वृक्ष लागवड होत आहे. तर डेकोरेटिव्ह पोल लाईट्स उभारणीच्या कामालाही गती आली आहे. सीताबर्डीकडून विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अजनी चौक ते रहाटे कॉलनी चौकादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वैविद्यपूर्ण वृक्ष लागवड होत आहे. याठिकाणी आलामंगा, ट्रावलर्स पाम, मुसंडा, सरेका पाम, वेरिगेटेड बांबू, क्रोटोन पेट्रा, ओडोलोम अशा एकूण 16 प्रजातींचे आकर्षक व डौलदार फुलांनी लदबद झाडे लावण्यात येत आहेत. याभागात विशिष्ट प्रकारचे लँडस्केपिंग करुन लॉन लावण्यात आली आहे. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा हिरवाई दिसून येत आहे. याच भागात 60 व्होल्ट क्षमतेचे डेकोरेटिव्ह पोल लाईट्स लावण्यात येत आहेत. जवळपास 800 मिटर रस्त्यावर 10 ते 12 मिटर अंतरावर प्रत्येकी 3.5 मिटर उंचीचा एक डेकोरेटिव्ह पोल लाईट्स याप्रमाणे 150 लाईट्स येथे उभारण्यात येत आहेत. याबरोबरच जे.पी. चौक, रॅडिसन ब्लु हॉटेल परिसर विमानतळ चौक ते सोनेगांव पोलीस स्टेशन दरम्यानही डेकोरेटिव्ह पोल लाईट्स लावण्यात येणार आहेत.
अजनी चौक ते रहाटे कॉलनी चौकादरम्यान रस्त्याच्या दुभाजकावर ग्लोसाईन पॅनल उभारण्यात आले आहेत. तसेच अजनी बसस्टँड सेंल्टरवर सी-20 परिषदेविषयीचे माहिती देणारे फलकही आकर्षणाचा विषय ठरत आहेत. या सर्व सौंदर्यीकरणामुळे नागपूर शहराला देखणे रुप प्राप्त होत आहे. सी-20 परिषदेसाठी शहराची सज्जताही यातून ठळकपणे दिसून येते आहे.