– जिल्ह्यासाठी 7 हजार 6 कोटींचा आराखडा
यवतमाळ :- जिल्ह्याच्या कृषी आणि ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी नाबार्डच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या आराखड्याचे जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांच्याहस्ते विमोचन करण्यात आले. पुढील वर्षाकरीता जिल्ह्यासाठी 7 हजार 6 कोटींचा आराखडा नाबार्डने तयार केला आहे.
यावेळी अग्रणी बँक प्रबंधक अमर गजभिये, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी अतुल इंगळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुशिल गरुड, खादी ग्रामोद्योग अधिकारी बी.एम. राठोड, कृषी उपसंचालक अविनाश चव्हाण यांच्यासह विविध बॅंकांचे शालील बालकृष्णन, अविनाश महाजन, ब्रजेंद्र कुमार सिंग, मनोज राठोड, पवन हेमनाणी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
आराखड्यामध्ये शेती व शेतीशी निगडीत क्षेत्रांसाठी ४ हजार ६९६ कोटी, सुक्ष्म, मध्यम व लघु क्षेत्रांसाठी १ हजार ५६४ कोटी, शिक्षण क्षेत्राकरिता ९० कोटी, आवास योजनेकरिता ३७० कोटी व अन्य पायाभूत सुविधांकरीता २८५ कोटी असा संभाव्य क्रेडीट क्षमता आराखडा नियोजित करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी नाबार्डच्या संभाव्य क्रेडीट क्षमता आराखड्यामध्ये प्राथमिक क्षेत्र व ग्रामीण विकासाकरीता भरीव वाढ केल्याबद्दल कौतुक केले. जिल्ह्यातील शेती, पशुपालन आणि उद्योजकता वाढीसाठी जिल्ह्यातील बँकांनी शासकीय प्रायोजित विभागांशी योग्य समन्वय साधून आराखड्याचे लक्षांक पुर्ण करण्याचे निर्देश दिले. जिल्हा अग्रणी प्रबंधक अमर गजभिये यांनी सर्व बँकांनी आराखड्यामध्ये निश्चित केलेल्या संभावित ऋण क्षमतेनुसार ग्रामीण व प्राथमिक क्षेताकरिता लक्षांक निश्चित करून प्राथमिक क्षेत्रांतर्गत लक्षांक पुर्ण करण्याचे आवाहन केले.
नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी अतुल इंगळे यांनी कृषी आणि ग्रामीण विकास क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी बँकांनी अधिकाधिक कर्ज प्रवाह सुनिश्चित करण्याचे आव्हान केले. सुक्ष्म, मध्यम व लघु क्षेत्रासह शेती प्रक्रिया उद्योग आणि कृषी पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देण्यासाठी बँकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजवावी, असे त्यांनी नमूद केले.