राज्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील पदे भरण्याची कार्यवाही सुरू – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन

मुंबई : पुण्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अतिविशेषोपचार विषयात अध्यापकीय संवर्गात सहयोगी प्राध्यापक , सहायक प्राध्यापक तसेच क व ड संवर्गातील १२१ पदे भरण्यात आली आहेत. तसेच इतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली.

राज्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील सुविधांबाबत सदस्य डॉ. वजाहत मिर्ज़ा यांनी लक्षवेधी मांडली होती. यास उत्तर देताना मंत्री गिरीश महाजन बोलत होते.

मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, पुण्यातील ससून रूग्णालयात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता विविध आजारांच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यात आलेले आहे. अतिविशेषोपचार विषयात अध्यापकीय संवर्गातील सहयोगी प्राध्यापक पदांच्या २ व सहायक प्राध्यापक पदांची ७ पदे मंजूर आहेत. त्याचप्रमाणे गट-क व गट-ड संवर्गात १२१ पदे भरण्यात आली आहेत.

अतिविशेषोपचार विषयातील रुग्णसेवेची निकड तसेच पदव्यत्तर विद्यार्थी संख्या वाढविण्याच्या दृष्टीने मंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर येथील विशेषोपचार विषयातील काही अध्यापकीय पदांचे स्थानांतरण व रुपांतरण तसेच काही पदे समर्पित करून ही पदे नव्याने निर्माण करण्यात येणार आहेत.

त्याचप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय, नागपूर या संस्थेकरिता गट-अ ते गट-ड मधील एकूण १३५ पदे निर्माण करण्यात आली आहेत. तसेच केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत प्रधानमंत्री स्वास्थ सुरक्षा योजनांतर्गत राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अकोला, यवतमाळ, लातूर व औरंगाबाद येथे अतिविशेषोपचार रुग्णालये सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर ४ अतिविशेषोपचार रुग्णालयांकरिता एकूण १८४७ पदे आवश्यक असून प्रथम टप्याकरिता आवश्यक असलेली गट-अ ते गट-ड संवर्गात एकूण ८८८ पदे निर्माण करण्यात आली आहे. उर्वरित द्वितीय व तृतीय टप्प्यासाठी आवश्यक असलेली अनुक्रमे ५५३ व ४०६ तसेच तांत्रिक संवर्गातील गट-क व गट-ड मधील अतिरिक्त २४८ अशी एकूण १२०७ पदे निर्माण करण्यात येणार आहेत.

अतिविशेषोपचार विषयातील अध्यापकीय वर्गातील प्राध्यापक-९, सहयोगी प्राध्यापक- १३ व सहायक प्राध्यापक-५९ इतक्या उमेदवारांना विविध अतिविशेषोपचार रुग्णालयात नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आले असल्याची माहितीही मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी दिली.

यावेळी सदस्य सचिन अहिर, अभिजित वंजारी, जयंत पाटील, किरण सरनाईक, भाई जगताप यांनी यावेळी चर्चेत सहभाग घेतला.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com