कधी भावा विरुद्ध भाऊ, काका विरुद्ध पुतण्या, बहिणी विरुद्ध भाऊ, काकू विरुद्ध पुतण्या थेट आईविरुद्ध मुलगा आणि आता त्या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदार संघात थेट बापा विरुद्ध मुलगी, ज्यांनी आजतागायत हे उपद्व्याप सतत केले, अनेक एकत्र कुटुंब आधी विभक्त केले नंतर उध्वस्त केले त्या महान नेत्याचे नाव तुम्हाला सांगण्याची गरज नाही. मात्र देव असा कि तो एकालाही सोडत नसतो, मग बारामतीला देखील हेच देवाने घडवून आणले, आजवरच्या अवाढव्य एकत्रित पवार कुटुंबावर नियतीने घाला घातलाच शेवटी आणि शरदरावांच्या गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय अस्वस्थ असलेल्या पुतण्याने फार मोठे धाडस तेही नेमके परिणाम माहित असतांना केले, काकांच्या सतत दबावाखाली किंवा जाणूनबुजून किंवा प्रेमापोटी बलाढ्य एकत्र पवार कुटुंबियातून अजितदादा बाहेर पडले खरे पण त्यांना देखील मन मोठे ठेवून काकांनी माफ केले नाही, आपला जीव जात असेल तर थेट पोटच्या मुलाचा देखील बळी घेणारी कडक हृदयशून्य भूमिका त्यांनी घेतली आणि बघता बघता त्यांनी सख्ख्या भावाचे कुटुंब वेगळे केले ज्यात अजितदादांच्या आईच्या हृदयाचे पार खोबरे झाले. राजकारणात यश मिळविण्याची हि अत्यंत सोपी पद्धत, अमुक एका विरोधातल्या बलदंड कुटुंबाची नेमकी बलस्थाने ओळखून नेमका त्यावर घाला घालायचा त्या कुटुंबाला राजकारणातून पार बेचिराख करून टाकायचे…
तिकडे विदर्भात अहेरी मध्ये तर त्यांना आयतीच संधी चालून आली, तेथला धाडसी दिलदार प्रभावी लोकमान्य लोकप्रिय राजा आणि नेता आमदार धर्मराव बाबा आत्राम जो राजा असूनही सामान्य प्रजेसाठी थेट रस्त्यावर उतरतो रस्त्यावर फिरतो त्याचा मोबाईल नंबर अहेरी मतदारसंघात साऱ्यांचा जवळपास तोंडपाठ आणि राजाही असा कि अमुक एखादा ओळखीचा असेल किंवा नसेलही कदाचित त्याचा कट्टर विरोधक जरी असला तरी एका क्षणात हेच धर्मराव बाबा प्रत्येकाचा फोन घेतात किंवा भेटायला येणाऱ्यांचे तेथल्या तेथे निरसन करून किंवा काम करून त्याला मोकळे करतात म्हणूनच अहेरीतले मतदार त्यांना कायम डोक्यावर घेऊन नाचतात, मनापासून राजावर सतत प्रेमाचा वर्षाव करतात त्यातून आत्राम हमखास निवडून येतात आणि हेच हुकमी आमदार धर्मराव बाबा आत्राम त्या महायुतीच्या गळाला लागले, अजितदादासंगे काकांना सोडून बाहेर पडले त्यातून शरदराव वेडेपिसे होणे स्वाभाविक होते, आत्रामांचा जावई त्यांच्या मोठ्या मुलीचा बाहेरून आलेला, थेट कर्नाटक बेळगावातून येथे दूरवर अहेरी मध्ये लग्नानंतर खुबीने एखाद्या घर जावयासारखा ठाण मांडून बसलेला ऋतुराज हलगीकर आता ज्या सासर्याने त्याला घडविले सर्वार्थाने मोठे केले विश्वास टाकला सारे व्यवहार हाती सोपविले ज्याला आणखी श्रीमंत केले तेच ऋतुराज बेसावध भावनिक सासर्याच्या राजकीय कारकिर्दीवरच उलटले असल्याचे आणि त्यातून ते पत्नी भाग्यश्री म्हणजे आत्रामांच्या कन्येला राजकारणात पुढे करताहेत बापा विरुद्ध भूमिका घ्यायला सांगताहेत हे शरद पवारांच्या कानावर जेव्हा गेले तेव्हा आधी पवारांनी डोळे किलकिले करीत, एक शिकार आयतीच हाती पडली असे त्यांनी म्हणे आधी ओरडून आजूबाजूच्यांना सांगितले आणि पवार कामाला लागले….
काही सिनेमे कसे येतात आणि जातात किंवा सिनेमातले अनेक कलावंत देखील असे अचानक गायब होतात तेच नेमके आत्रामांच्या राज घराण्यात घडले आहे म्हणजे अंबरीश राजे आत्राम हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांच्या मंत्री मंडळात राज्यमंत्री आहेत हे त्याकाळी अनेक मंत्र्यांना देखील माहित नव्हते, मंत्रालयात ते क्वचित फिरकायचे विशेष म्हणजे ते बहुतेकवेळा मंत्रालयासमोरील त्यांच्या बंगल्यातच असल्याचे पण तेथेही म्हणे लपून बसायचे. वास्तविक फार मोठा राजकीय वारसा, दिवंगत माजी आमदार सत्यवान राजे आत्राम यांचा हा परदेशातून शिकून आलेला हा रुबाबदार उच्चशिक्षित राजकुमार पण त्याने फडणवीसांच्या विश्वासाला तडा दिली, आजवरचा एक अत्यंत अकार्यक्षम राज्यमंत्री अशी त्यांची त्याकाळी ओळख होती. एकदा तर त्यावेळेच्या एका सचिवाने अंबरीश यांच्या खाजगी सचिवाला आत्राम समजून स्वतः उठून बसायला जागा करून दिली होती किंवा पुढे पुढे तर फडणवीसांना देखील अंबरीश राजे आपल्या मंत्रिमंडळात असल्याचा विसर पडायला लागला होता. वस्तुस्थिती अशी कि संघ मुख्यालयाला आणि भाजपाला विशेषतः गडचिरोली जिल्ह्यातील हे राजघराणे आपल्याकडे असावे असे मनापासून वाटत होते म्हणूनच फडणवीस यांनी अंबरीश राजेंना राजकीय ताकद देण्यासाठी मंत्रिमंडळात स्थान दिले पण हेच अंबरीश अमुक एखादा त्यांना चुकून भेटायला आला तर ते लहान मुलासारखे दाराआड लपून राहायचे आणि भेटणारा न भेटता बाहेर पडला कि जोरजोरात टाळ्या वाजवायचे, अंबरीश राजे यांना चालून आलेली सुवर्ण संधी त्यांनी घालविली आणि केवळ काही दिवस राजकीय अडगळीत पडलेले सापडलेले धर्मराव बाबा आत्राम पुन्हा प्रकाश झोतात आले, आमदार झाले आणि मंत्री होत त्यांनी पुन्हा एकवार गचिरोली जिल्ह्यात आणि अहेरी या त्यांच्या विधानसभा मतदार संघात मजबूत पकड घेतली, पुढे त्यांना कुठून दुर्बुद्धी सुचली कळत नाही त्यांनी आपली राजकीय वारसदार म्हणून मोठी कन्या भाग्यश्रीस पुढे आणले तिला सत्तेच्या राजकारणात स्वतः मेहनत घेत मोठे केले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले त्याचवेळी सारे आर्थिक व्यवसायिक व्यवहार मुलासारखे मानलेल्या जावई ऋतुराज यांच्या हाती सोपविले हीच त्यांची फार मोठी चूक झाली. हा आत्राम सस्पेन्स येथेच संपत नाही…
अपूर्ण : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी