– ६० वर्षावरील नागरिकांसाठी बुस्टर डोस: सुरक्षा नियमांचे पालन करा
नागपूर :- कोरोनाच्या जेएन-वन व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेची संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज झालेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याद्वारे गुरूवारी (ता.२१) घेण्यात आलेल्या बैठकीत मिळालेल्या सूचनांनुसार मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मनपा आरोग्य विभागाला आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यांनी नवीन व्हेरियंटमुळे घाबरण्यापेक्षा सतर्कता बाळगण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांची बैठक घेउन निर्देश दिले. यानंतर नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चौधरी यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेत रुग्णालयांची स्थिती जाणून घेतली. जेएन-वन व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेड्सची यंत्रणा सज्ज ठेवण्याबाबत त्यांनी निर्देशित केले. नागपूर शहरतील ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मनपाद्वारे नाकाद्वारे देण्यात येणा-या बुस्टर डोसबाबत नियोजन करण्याचे देखील आयुक्तांनी निर्देश दिले आहेत.
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे होणारा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याची गरज आहे. सर्दी, खोकला, ताप अशी कुठलीही लक्षणे आढळल्यास त्वरीत वैद्यकीय सल्ला घ्यावा व आवश्यकता असल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी. नागपूर शहरामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे कोरोना चाचणी केंद्र सुरू आहेत. याशिवाय नागपूर महानगरपालिकेची चाचणी केंद्र देखील लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. नागरिकांनी कोरोनामुळे होणारा धोका लक्षात घेता गर्दीच्या ठिकाणी जाताना सुरक्षेची खबरदारी घेण्याचे आवाहन मनपाद्वारे करण्यात येत आहे. मास्क लावणे, नियमित हात धुणे, सॅनिटायजरचा वापर करणे यासारख्या सवयी पुन्हा एकदा अंगीकारण्याचे आवाहन करण्यात येत आहे.