चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे स्वच्छता अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असुन विविध उपक्रम या पंधरवाड्यात राबविण्यात येत आहेत. स्वच्छता कार्याला सहयोग म्हणुन मनपाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय व रयतवारी मराठी शाळेला टाकाऊ वस्तुंपासून बनविलेले प्लास्टीक बेंच व प्रत्येकी एक प्लास्टिक वेस्ट कलेक्शन डस्टबिन सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या इनरव्हील क्लब ऑफ चांदा फोर्टतर्फे देण्यात आले.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या पंधरवड्याच्या कालावधीत स्वच्छता अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असून यामध्ये “इंडियन स्वच्छता लीग” हा स्वच्छता विषयक देशव्यापी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात सर्वांचा सहभाग असावा या दृष्टीने महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देऊन इनरव्हील क्लब ऑफ चांदा फोर्टने प्लास्टिक वेस्ट कलेक्शन डस्टबिन, टाकाऊ वस्तुंपासून बनविलेले प्लास्टीक बेंच तसेच रयतवारी कॉलरी मराठी शाळेला एक स्मार्ट टीव्ही भेट दिला आहे.
या प्लास्टिक वेस्ट कलेक्शन उपक्रमामुळे प्लास्टिकचा वापर कमीत कमी करावा आणि पर्यावरणाचे संरक्षण व्हावे ही भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यास मदत होणार आहे. या प्लास्टिक वेस्ट कलेक्शन डस्टबिनमधे जमा होणारा प्लास्टीक कचरा हा टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तु बनविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांकडे देण्यात येणार आहे.