संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कुंभारे कॉलोनीत स्वमालकी च्या इमारती असूनही भाड्याच्या घरात आहेत अंगणवाड्या
कामठी :- शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना प्राथमिक शिक्षणाची ओढ लागावी तसेच गरोदर, स्तनदा माता व बालकांच्या कुपोषण निर्मूलन साठी योग्य पूरक आहार पुरविणे या मुख्य उद्देशाने एकात्मिक बाल विकास प्रकल्प कामठी शहरी प्रकल्पाअंतर्गत रामटेक, उमरेड, नरखेड, मोवाड, मोहपा, कळमेशवर,काटोल, खापा, सावनेर येथे 115 अंगणवाड्या कार्यरत असून कामठीत 91 अंगणवाड्या कार्यरत आहेत. यातील 21 अंगणवाड्या ह्या भाड्याच्या घरात असून इतर एकात्मिक बाल विकास विभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या स्वमालकीच्या इमारतीत आहेत. सन 2012-13मध्ये माजी नगराध्यक्षा रुबिना शेख यांच्या कार्यकाळात एकात्मिक बाल विकास सेवा योजना च्या 58 लक्ष रुपयाच्या निधीतून 13 ठिकाणी अंगणवाडी बांधकामाचे काम नगर परिषदला देण्यात आले होते. आज 10 वर्षे लोटून जात आहेत तरी फक्त 9 अंगनवाड्याचे बांधकाम पूर्णत्वास आले असून उर्वरित 4 अंगनवाड्याचे काम प्रगतीपथावर असल्याच्या नावावर अजूनही रखडलेले आहे.एकीकडे पूर्णत्व झालेल्या अंगनवाड्याचा ताबा अजूनपावेतो अंगणवाडी विभागाला देण्यात आले नसल्याने नाईलाजाने स्वमालकीच्या इमारती असूनही भाड्याच्या खोलीत अंगणवाड्या सुरू असून विनाकारण भाड्याच्या भुर्दंड बसत आहे तर पूर्णत्वास आलेल्या या शासकीय इमारतीत खाजगी शिकवणी वर्ग चा डल्ला बसलेला आहे.तर काहींनी या भाड्याच्या खोलीत राहणे सुरू केले आहे.
एकात्मिक बाल विकास प्रकल्प कामठीच्या वतीने 58 लक्ष 50 हजार रुपयांचा निधी नगर परिषद ला देऊन वारीसपुरा,गांधीनगर,आझादनगर, गौतम नगर, कामगार नगर, खलाशी लाईन, वारीसपुरा मैदान, कुंभारे कॉलोनी, गांधी नगर,यादव नगर याठिकाणी 13 अंगणवाड्या बांधण्याचे काम 2012 मध्ये देण्यात आले होते. यातील 9 अंगणवाड्या पूर्णत्वास येऊन बरेच वर्षे लोटून गेले तर त्याच कालावधीत उर्वरित अंगांवड्याचे काम अजूनही रखडलेले आहे. जसे की कुंभारे कॉलोनीत 3 तर छत्रपती नगर येथे एक अंगणवाडी मागील दहा वर्षांपासून बांधकाम प्रगतीवर आहे यातील काहींना दार नाही, खिडक्या नाही तर कुठे शौचालयाची सोय नाही अशी स्थिती आहे ज्यामुळे भाड्यावर सुरू असलेल्या ह्या अंगणवाड्या कुठे समाजभवन, बुद्धविहारी, तसेच भाड्याच्या खोलीत 750 रुपये प्रति महिना भाडेतत्वावर सुरू आहेत. मात्र आज दहा वर्षाचा कालावधी लोटूनही नगर परिषद प्रशासनाकडून या अंगनवड्याचे बांधकाम पूर्णत्वास केले नसून नगर परिषद प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येते. तेव्हा पूर्णत्वास आलेल्या अंगनवाड्याचा ताबा नगर परिषदने एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प विभाग कामठीला देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे तर दुसरीकडे या अंगनवाड्यात अभ्यास केंद्र चालकांनी तसेच काही कुटुंबांनी बिनधास्तपणे अतिक्रमण केले आहे.तसेच काहींनी आपला कुटुंब वास्तव्यास ठेवला आहे. तेव्हा या भाड्याने कार्यरत असलेल्या अंगणवाडी केंद्रांनी हक्काची बाजू कुणासमोर मांडावी असा प्रश्न उभा होऊन ठाकला आहे.