नागपूर :- स्वच्छ आणि सुंदर नागपूर संकल्पना सर्वांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने दीक्षाभूमी आणि जवळच्या परिसरात नागपूर महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे स्वच्छतेचा जागर केला.याप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त राम जोशी, शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, समन्वयक विनय बगले, प्रशांत टेंभुर्णे, मुख्याध्यापक धैर्यशील वाघमारे, मनोज लोखंडे, कल्सिया, पथनाट्याचे दिग्दर्शक सुधीर पाटील यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते.
सार्वजनिक ठिकाणी कचरा करू नये, कचरा आणि प्लॅस्टिकमुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, याकरिता मनपाच्या मौलाना अबुल कलाम आझाद मनपा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी रहाटे कॉलनी चौक येथे पथनाट्य सादर केले. या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. याशिवाय डॉ. राम मनोहर लोहिया मनपा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे स्मारक चौक येथे पथनाट्य सादर करीत दीक्षाभूमीवर आलेल्या अनुयायांना पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
सोबतच कपीलनगर मनपा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी काछीपुरा चौकात कचऱ्यामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची माहिती दिली. तसेच स्वच्छतेची सुरुवात नागरिकांनी स्वतः पासून करायला हवी हा संदेश दिला. तर लाल बहादूर शास्त्री हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी लक्ष्मीनगर चौकात स्वच्छता जागर केला. नागरिकांनी पथनाटयाला भरभरुन प्रतिसाद दिला.