शहराला दर्जेदार अग्निशमन सुरक्षा सेवा देण्यास मनपा कटिबद्ध – मनपा प्रशासक तथा आयुक्त राधाकृष्णन बी

– अग्निशमन सेवा दिन साजरा 

नागपूर :- अहोरात्र जीवाची पर्वा न करता शहर आणि शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचे कार्य अग्निशमन विभाग सातत्याने करत आले आहे. या कार्यात अनेकांना आपल्या प्राणाची बाजी देखील लावावी लागली आहे. शहर वाढत असताना विभागाची जबाबदारी सुद्धा वाढत आहे. नागपूर शहरातील प्रत्येक नागरिकास दर्जेदार अग्निशमन सुरक्षा सेवा प्रदान करण्यास नागपूर महानगरपालिका कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मनपा प्रशासक तथा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले.

अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागातर्फे अग्निशमन सेवा सप्ताहाच्या अनुषंगाने शुक्रवारी (ता. १४) मनपा मुख्यालयातील हिरवळीवर अग्निशमन सेवा दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मंचावर अतिरिक्त आयुक्त तथा नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त रवींद्र भेलावे, उपायुक्त प्रकाश वराडे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे उपस्थित होते. याप्रसंगी माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक महेश धामेचा, सहायक आयुक्त विजय हुमने, शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर आदींची उपस्थिती होती.

मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्यासह मान्यवरांनी अग्निशमन कार्य करताना प्राणाची आहुती देणा-या शहिद जवानांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. आयुक्तांनी अग्निशमन परेडचे निरीक्षण केले तसेच अग्निशमन जवानांद्वारे देण्यात आलेली मानवंदना स्वीकारली. अग्निशमन विभागाच्या तीन प्लाटूनद्वारे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी, अतिरिक्त आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे सीईओ अजय गुल्हाणे आणि अतिरिक्त आयुक्त राम जोशी मानवंदना देण्यात आली. पहिल्या प्लाटूनचे नेतृत्व कॉटन मार्केट अग्निशमन केंद्राचे केंद्र अधिकारी भगवान वाघ, दुस-या प्लाटूनचे नेतृत्व लकडगंज अग्निशमन केंद्राचे प्रभारी उपअग्निशमन अधिकारी दिलीप चौहान आणि तिस-या प्लाटूनचे नेतृत्व सक्करदारा अग्निशमन केंद्राचे प्रभारी उपअग्निशमन अधिकारी प्रकाश कावडकर यांनी केले.

मनपा आयुक्तांनी अग्निशमन विभागाच्या जवानांना अग्निशमन सेवा दिवसाच्या शुभेच्छा देत त्यांनी बजावलेल्या सेवा कार्याबद्दल अभिनंदन केले. ते म्हणाले, नागपूर शहरात विविध सेवांसाठी अनेक यंत्रणा कार्यरत आहेत मात्र नागरिकांना जीव आणि संपत्तीचे रक्षण करण्याचे महत्वाचे कार्य करणारी यंत्रणा शहरात एकमेव अग्निशमन आणि आणीबाणी सेवा आहे. मनपा अग्निशमन आणि आणीबाणी सेवा विभागाने शहरापासून २०० किमी अंतरावरही सेवा दिली आहे. विभागामध्ये योग्य मनुष्यबळ, दर्जेदार सुरक्षा साहित्य, सोयी सुविधा देण्याकडे कटाक्षाने लक्ष असतो. विभागाला सक्षम करण्याच्या दृष्टीने ३२ मीटर हॅड्रॉलिक प्लॅटफॉर्म खरेदी करण्यात आले आहे. लवकरच विभागाच्या सुरक्षा ताफ्यात ७० मीटर हॅड्रॉलिक प्लॅटफॉर्म येईल, असेही आयुक्त म्हणाले.

शहरातील काही अग्निशमन केंद्र अद्ययावत करण्याचे कार्य सुरू आहे. या ठिकाणी केवळ अग्निशमन केंद्र न साकारता कर्मचा-यांच्या निवासाची देखील व्यवस्था करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. अग्निशमन सेवा कार्य अनेकांनी प्राणार्पण केले तर अनेकांना कायमचे दिव्यांगत्व आले आहे. अशा घटना घडल्यास संबंधित जवानाच्या कुटुंबियांना तात्काळ मदत मिळावी याकरिता मनपाद्वारे सर्व अग्निशमन कर्मचा-यांचे टर्म लाईफ इन्सूरन्स काढण्यात येणार असून यासंदर्भात अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असल्याचेही मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले तर आभार उपमुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे यांनी मानले.

शहिद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान

अग्निशमन बचाव कार्य करीत असताना शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांचा मनपातर्फे सन्मान करण्यात आला. आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी, अतिरिक्त आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे सीईओ अजय गुल्हाणे आणि अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी तुळशीरोप आणि भेटवस्तू देउन कुटुंबियांना सन्मानित केले. शहिद गुलाब कावळे यांच्या पत्नी सरोजिनी गुलाब कावळे, शहिद प्रभू कुहिकर यांच्या पत्नी चंद्रकला प्रभू कुहिकर यांना मनपाच्या शिक्षण आणि आरोग्य विभागामध्ये अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात आली आहे. त्यांच्यासह शहिद रमेश ठाकरे यांचे पुत्र कपील रमेश ठाकरे यांना देखील मान्यवरांनी सन्मानित केले.

अग्निशमन सेवा सप्ताहाची पार्श्वभूमी

१४ एप्रिल १९४४ रोजी लंडनहून कराची मार्गे मुंबईत गोदीत दाखल झालेल्या ‘एस.एस.फोर्ट स्टिकींग’ या जहाजाचा स्फोट होउन भीषण आग लागली. या आगीशी झुंज देताना अग्निशामक दलाच्या ६६ जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. या दिवसाचे स्मरण म्हणून अग्निशमनाचे कार्य करताना प्राणाची आहुती देणा-या अग्निशमन सेवेतील शहिदांच्या कर्तव्याची जाणीव व प्रेरणा देणा-या सर्व हौतात्म्यांना या दिवशी संपूर्ण भारतात श्रद्धांजली अपर्ण केली जाते. आगीच्या धोक्या संबंधात जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सुचनेनुसार दरवर्षी १४ ते २० एप्रिल या कालावधीत संपूर्ण देशात ‘अग्निशमन सेवा सप्ताह’ व १४ एप्रिल रोजी अग्निशमन सेवा दिन साजरा करण्यात येतो. अग्निशमन सुरक्षा कार्यात कर्तव्य बजावत असताना नागपूर महानगरपालिकेच्याही अधिकारी, कर्मचा-यांनी हौतात्म्य पत्करले. त्यात मनपा मुख्यालयातील अग्निशमन केंद्रात केंद्र अधिकारी म्हणून कार्यरत गुलाबराव कावळे हे २८ नोव्हेंबर १९८१ ला इमामवाडा पोलिस चौकीजवळ घराला लागलेल्या आगीत बचाव कार्य करीत असताना विटांची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली व त्यात ते गंभीररित्या जखमी झाले, त्यात त्यांचे निधन झाले. १९ जानेवारी २००० रोजी कामठी रोडवरील चॉक्स कॉलनी येथे एल.पी.जी. कुकींग गॅसचे सिलेंडर लिकेजच्या घटनेवर बचावकार्य करीत असताना अचानक आगीचा भडका उडाला त्यात अग्निशमन विभागाचे ३ कर्मचारी गंभीररित्या भाजले. त्या तिघांपैकी अग्निशमन विमोचक प्रभू कुहिकर यांचे १२ फेब्रुवारी २००० रोजी रुग्णालयात निधन झाले. अग्निशमन विभागातील अग्निशमन विमोचक रमेश ठाकरे हे २८ जून २००५ ला ग्रेट नागरोड येथील इमारतीला आग लागलेली असताना इमारतीच्या आत शिरून अग्निशमनाचे कार्य करीत असताना अचानक इमारत कोसळली व त्यात त्यांचा मृत्यू झाला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाजपा प्रदेश कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Fri Apr 14 , 2023
मुंबई :- भाजपा प्रदेश कार्यालयात शुक्रवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा राष्ट्रीय चिटणीस विजया रहाटकर, प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रवक्ते अतुल शाह, प्रदेश मुख्यालय सहप्रभारी सुमंत घैसास, प्रदेश मुख्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.     Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!