– स्थापत्य विभागाशी संबंधित कार्य तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सोमवारी (ता.१२) बैदृानाथ चौक येथील मनपाच्या कारखाना विभागाची पाहणी केली. मनपा आयुक्तांच्या या पाहणी दौ-याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, कार्यकारी यांत्रिकी अभियंता राजेश गुरमुळे, कनिष्ठ अभियंता देवचंद काकडे, कनिष्ठ अभियंता (विद्युत) दिलीप वंजारी उपस्थित होते.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी कारखाना विभागाच्या संपूर्ण परिसराची पाहणी केली. कारखाना विभागाचे प्रशासकीय कामकाज सुरू असलेली इमारत जीर्णावस्थेत आलेल्या आहेत. परिसरामध्ये प्रशासकीय कामकाजाकरिता नवीन इमारत तयार करण्यात आलेली आहे. या इमारतीमधील स्थापत्य विभाग आणि विद्युत विभागाशी संबंधित कार्य तातडीने पूर्ण करून नवीन इमारतीमध्ये कामकाज सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याबाबत मनपा आयुक्तांनी निर्देश दिले. परिसरामध्ये पुरेशी प्रकाश व्यवस्था असावी यादृष्टीने हायमास्ट लाईट तसेच वाहनांची दुरूस्तीसाठी तयार करण्यात आलेल्या शेडमध्ये देखील प्रकाश व्यवस्था करण्याचेही निर्देश मनपा आयुक्त डॉ. चौधरी यांनी दिले.
कारखाना विभागातील मनुष्यबळाचा देखील यावेळी आयुक्तांनी आढावा घेतला. विभागामध्ये आवश्यक त्या तांत्रिक पदांवर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींची निवड करण्याबाबतही त्यांनी सूचीत केले. परिसरामध्ये जुनी वाहने आणि भंगार साहित्य मोठ्या प्रमाणात पडलेले आहे. परिसरातील जागा मोकळी करण्यासाठी हे सर्व साहित्य आवश्यक प्रक्रिया करून भंगारमध्ये काढण्याबाबत देखील आयुक्तांनी निर्देश दिले. विभागाकडे दुरुस्तीसाठी येणारी वाहने लवकरात लवकर दुरूस्त करुन पुन्हा सेवेत रूजू व्हावेत यादृष्टीने कार्यवाही करण्याचेही निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
यावेळी कारखाना निरीक्षक विक्रम मानकर, वरीष्ठ लिपिक प्रमोद ठाकरे, विद्युत अभियांत्रिकी सहायक के.व्ही. बहादूरे आदी उपस्थित होते.