– विद्यार्थ्यांनी दिली अत्याधुनिक ‘स्टेम लॅब’ची माहिती
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (२५ एप्रिल) हनुमान नगर झोनमधील मनपा लालबहादूर शास्त्री प्राथमिक व माध्यमिक शाळेला भेट देउन पाहणी केली. यावेळी मनपा शिक्षणाधिकारी प्रफुल कछवे उपस्थित होते. पीएम श्री योजने अंतर्गत लाल बहादूर शास्त्री शाळेची निवड करण्यात आली आहे.
मनपातर्फे लाल बहादूर शास्त्री शाळेमध्ये विद्यार्थ्यांकरिता रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित अशा विविध विषयांचे अनुभूतीतून शिक्षण देणा-या अत्याधुनिक ‘स्टेम लॅब’प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेचे डॉ. चौधरी यांनी निरीक्षण केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी आयुक्तांना स्टेम लॅब बद्दल तसेच वेगवेगळ्या प्रयोगांबद्दल माहिती दिली. या प्रयोगशाळेचा उपयोग त्यांच्या शिक्षणात कसा होतो याबद्दलही त्यांनी आयुक्तांना सांगितले. हायस्कूलच्या मुख्याध्यापिका लता राजूकमार कनाटे आणि प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सरिता येवले यांनी आयुक्तांना शाळेबद्दल माहिती दिली.
शिक्षण विभागामार्फत मनपाच्या लाल बहादूर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळेसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी माध्यमिक शाळा, एम.ए.के. आझाद उर्दू माध्यमिक शाळा, दुर्गानगर मराठी माध्यमिक शाळा, जी.एम. बनातवाला इंग्रजी माध्यमिक शाळा, राममनोहर लोहिया हिंदी माध्यमिक शाळा, संजयनगर हिंदी माध्यमिक शाळा या सात शाळांमध्ये अत्याधुनिक स्टेम लॅब तयार करण्यात आली आहे. विज्ञानातील रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणितातील घटक विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने प्रयोगाच्या माध्यमातून शिकता यावे यासाठी मनपातर्फे ‘स्टेम लॅब’ची निर्मिती करण्यात आली आहे. स्टेम लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रयोगाच्या माध्यमातून विषयाचे शिक्षण दिले जाते. प्रत्यक्ष सहभागाद्वारे शिक्षण मिळत असल्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभूती आणि कृतीतून विषयाची सांगोपांग माहिती मिळते. मनपा आयुक्तांनी या लॅबची विस्तृत माहिती जाणून घेत मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
शासनाकडून प्राप्त निधीतून या शाळेची डागडुजी केली जात आहे. आयुक्तांनी मुखाध्यापकांना शाळेतील तुटलेले बेंचेस आणि टेबल बदलण्याचे निर्देश दिले. त्यांनी प्रसाधनगृहांची पाहणी करून स्वच्छता नीट ठेवण्याचेही निर्देश दिले. त्यांनी एलकेम कंपनीतर्फे सहयाद्री संस्थेला मनपा शाळेतील विध्यार्थ्यांच्या संगणक शिक्षणासाठी दिलेल्या बसचे निरीक्षण केले आणि विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली.
याप्रसंगी शिक्षण विभागाचे श्री विनय बगळे, व शाळेतील शिक्षक उपस्थित होते.