– अधिकारी-कर्मचाऱ्यांशी साधला संवाद
नागपूर :- नागपूर महानगरपालिकांचे नवनियुक्त आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी बुधवारी (५ जुलै) सकाळी मनपा मुख्यालयातील प्रशासकीय इमारतीतील सर्व विभागांची पाहणी केली. यावेळी आयुक्तांनी संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला व कामाची माहिती जाणून घेतली.
याप्रसंगी प्रभारी अतिरिक्त आयुक्त निर्भय जैन, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त मिलींद मेश्राम, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, उपसंचालक नगर रचना प्रमोद गावंडे, कार्यकारी अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, अजय मानकर, कमलेश चव्हाण, सुनिल उईके, रविन्द्र बुंधाडे, अजय डहाके, राजेश दुफारे, अमोल चौरपगार आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
मनपा आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सर्व उपायुक्तांचे कार्यालय, सामान्य प्रशासन विभाग, लेखा व वित्त विभाग, मालमत्ता कर विभाग, लोककर्म विभाग, नगर रचना विभाग, आरोग्य विभाग, माहिती व तंत्रज्ञान विभाग, प्रकल्प विभाग, अग्निशमन विभाग, शिक्षण विभाग, उद्यान विभाग, सार्वजनिक आरोग्य व अभियांत्रिकी विभाग, जलप्रदाय विभाग अशा सर्व विभागांसह श्रध्देय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटरला देखील भेट दिली. सेंटरद्वारे संपूर्ण शहरात लावण्यात आलेल्या 3600 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वाहतूक आणि गुन्हे नियंत्रणासाठी निर्माण यंत्रणा तसेच येथील मनपाचे केंद्रीय नियंत्रण कक्ष या सर्वांची देखील माहिती आयुक्तांनी जाणून घेतली. या वेळी नागपूर स्मार्ट सिटीचे ई-गव्हनर्स विभागाचे महाव्यवस्थापक डॉ. शील घुले उपस्थित होते.