‘वॉकर फ्रेन्डली’ शहराच्या निर्मितीसाठी सर्व यंत्रणांनी सहकार्य करावे, मनपा आयुक्तांचे आवाहन : ‘नागपूर हेल्दी स्ट्रीट’ कार्यशाळा संपन्न

नागपूर : शहराचा विकास करताना सिमेंट रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो या भौतिक सुविधांच्या विकासासोबत सर्वांच्या उपयोगात येणारे रस्ते निर्माण करणे ही गरज आहे. सायकलिंग आणि पायी चालणा-यांनाही इतर वाहनांच्या बरोबरीनेच रस्त्याचा उपयोग करता यावा यासाठी रस्त्यांची रचना करण्यासाठी मनपाने पुढाकार घेतला आहे. सायकलिंग आणि वॉकर फ्रेन्डली शहराच्या निर्मितीसाठी शहराच्या विकासात सहभाग असलेल्या सर्व यंत्रणांनी सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने आयटीडीपी द्वारे नागपूर शहरात उच्च दर्जाच्या रस्त्यांच्या नेवटर्क संदर्भात नियोजन, डिझाईन आणि अंमलबजावणीसाठी ‘नागपूर हेल्दी स्ट्रीट’ क्षमता विकास कार्यशाळा गुरूवारी (ता.१९) मनपाच्या महाल येथील राजे रघोजी भोसले नगरभवन (टाउन हॉल) येथे घेण्यात आली. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी मनपा आयुक्त बोलत होते. यावेळी नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मनपाचे अतिरिक्त आयुक्त अजय गुल्हाने, मनपाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण उपस्थित होते.

कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून आयडीपीआय इंडियाचे उपव्यवस्थापक प्रांजल कुलकर्णी, पॅव्हटेक कन्सलटंटचे संचालक विकास ठाकर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, ओयॅसिस डिझाईनच्या अर्बन डिझाईनर आंचल नंदा प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेला मनपा, स्मार्ट सिटी, नागपूर वाहतूक पोलिस विभाग, मेट्रो, राष्ट्रीय महामार्ग विभाग, एनएचएआय, विद्युत विभाग, कंत्राटदार,, डिझाईन कन्सलटंट आदी विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना मनपा आयुक्तांनी शहरातील रस्त्यांची योग्य रचना करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. देशातील अनेक मोठ्या शहरांनी रस्त्यांची रचना बदलल्याने वाहतूक आणि पार्कींग दोन्ही समस्यांबाबत फायदा झाला असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर शहरात पार्कींग, फुटपाथच्या योग्य वापरासह वर्तवणूक बदलासाठी रस्त्यांतील प्रत्येक वाहनासाठी स्वतंत्र उपलब्धता आवश्यक आहे. हे बदल करताना अशी कार्यशाळा महत्वाची ठरत असल्याचे सांगत त्यांनी आयटीडीपी इंडियाच्या पुढाकाराचे कौतुक केले. शहरात वाहतूक समस्या आणि रस्त्यासंबंधी इतर समस्यांवर मात करण्यासाठी रस्त्यांची रचना करतानाचे नियोजन, डिझाईन आणि अंबलबजावणीसाठी सर्व विभाग आणि यंत्रणांचे महत्वाचे कार्य आहे. सर्वांनी समन्वयाने कार्य केल्यास येत्या काळातच शहराचा चेहरामोहरा पालटलेला दिसेल, असा विश्वासही मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केला.

प्रत्येक नागरिकाला रस्त्याची योग्य जागा आवश्यक : प्रांजल कुलकर्णी

बस, कार व अन्य चार चाकी वाहन यासोबतच सायकल आणि पायी चालणारी व्यक्ती अशा प्रत्येक नागरिकाला रस्त्यावर त्याची योग्य जागा मिळणे आवश्यक असल्याचे मत कार्यशाळेतील मार्गदर्शक आयडीपीआय इंडियाचे उपव्यवस्थापक प्रांजल कुलकर्णी यांनी मांडले. त्यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून वाहतूक समस्या आणि त्यावरील उपायांचे डिझाईन याबाबत माहिती दिली. वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतुकीची समस्या ही वाढत जाणारी बाब आहे. अशात सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा उपयोग करून वाहनांची संख्या कमी करण्यावर भर देण्याची गजर असल्याचे ते म्हणाले.

यावेळी मनपातील अर्बन डिझाईन सेलचे हर्षल बोपर्डीकर व मोनाली जयस्वाल यांनी ऑरेंज सिटी स्ट्रीट, सेंट्रल बाजार रोड, महाराज बाग ते सालवे चौक, रामनगर ते शंकर नगर आणि वर्धमान नगर येथील रस्त्यांच्या प्रस्तावित डिझाईनबाबत माहिती दिली. त्यांनी अर्बन डिझाईन सेलद्वारे नागपूर शहरातील रस्त्यांची रचना बदलविण्याबाबत करण्यात आलेले डिझाईन यावेळी सादरीकरणातून दाखविले.

अंमलबजावणीतील चुका टाळण्यासाठी सुक्ष्म नियोजन : विकास ठाकर

अर्बन डिझायनद्वारे रस्त्यांची रचनांची संकल्पना मांडली जाते व त्यानुसार कामही केले जाते. मात्र बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष न दिल्याने अंमलबजावणीमध्ये अनेक चुका दिसून येतात. या चुका टाळण्यासाठी सुक्ष्म नियोजन आवश्यक असल्याचे मत पॅव्हटेक कन्सलटंटचे संचालक विकास ठाकर यांनी मांडले. रस्त्यांच्या रचनांना प्रत्येक्षात अंमलबजावणी करताना संबंधित सर्व यंत्रणांचे समन्वय आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. रस्त्यांसोबतच सायकल ट्रॅक, फुटपाथ, नागरिकांना बसण्याची व्यवस्था हे सर्व करताना त्यात वापरण्यात येणारे मटेरियल, पेव्हरचा आकार, रस्ता ओलांडण्याच्या स्थळी वाहनांचा वेग कमी होण्यासाठी करावयाचे बदल, झाडांच्या मुळांना काँक्रीटपासून वाचविण्यासाठी उपाय या सर्व गोष्टी अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. सिवर लाईन, पाणी पुरवठा लाईन, विद्युत लाईन या सर्व वाहिन्या अशा सर्वांबाबत त्यांनी बारकावे मांडले.

मुंबईची सार्वजनिक परिवहन व्यवस्था डोळ्यापुढे काम केल्यास बदल शक्य : बापूसाहेब गायकवाड

लोकल रेल्वे आणि शहर बस सेवा हे मुंबई शहरातील विकासाचे दोन महत्वाचे भाग आहेत. या दोन्ही बाबी वगळल्यास संपूर्ण मुंबई शहर स्थिर होईल. सर्वाधिक लोकसंख्या असून देखील येथील नागरिकांना परिवहनाच्या दोन महत्वाच्या सोयी नियोजनबद्ध त्या उपलब्ध झालेल्या आहेत. इतर शहरांनी सुद्धा मुंबई शहराची परिवहन व्यवस्था डोळ्यापुढे ठेवून काम केल्यास बदल नक्की शक्य असल्याचे मत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी पिंपरी चिंचवड शहरात राबविण्यात येत असलेल्या हेल्दी स्ट्रीट संकल्पनेची माहिती दिली. सार्वजनिक परिवहन व्यवस्थेच्या वापराबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अनेक मोठे पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्यांच्या रचनेत बदल, बसच्या डिझाईनमध्ये सुद्धा बदल करून नागरिकांना सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा उपयोग करण्याबाबत जनजागृती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आयटीडीपी च्या सहकार्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे ३८ पेक्षा जास्त रस्ते अर्बन स्ट्रीट प्रकल्पामधून विकसीत होत असल्याचे त्यांनी सांगितले.

ओयॅसिस डिझाईनच्या अर्बन डिझाईनर आंचल नंदा यांनी ओयॅसिसद्वारे देशभरात करण्यात आलेल्या कार्याची माहिती दिली. कार्यशाळेचे संचालन आयटीडीपीचे अर्बन प्लॅनर सिद्धार्थ गोडबोले यांनी केले तर आभार मनपाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण यांनी मानले.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अंत्योदय कार्ड धारकांना साखर वाटप करा तहसीलदारांना नागरी सुविधा समितिचे निवेदन

Fri Jan 20 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- शासनाकडून अंत्योदय राशन कार्ड धारकांना प्रति कार्ड 1 किलो साखर प्रत्येक महिन्याला देण्याचे निर्देश आहे परंतू रास्त भाव स्वस्त धान्य दुकानदार अंत्योदय कार्ड धारकांना साखर आली नसल्याचे सांगून उलट पावली परत पाठवत आहेत याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नागरी सुविधा समितिच्या वतीने तहसीलदार अक्षय पोयाम यांना आज शुक्रवारी दुपारी निवेदन देऊन दोषी रास्त भाव स्वस्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!