विविध विकास कामांच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजनेसह विविध विकास कामांचे भूमिपूजन

नाशिक : पाणी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येईल. तसेच विविध विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.            आज नांदगाव तालुक्यातील करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजना, शिवसृष्टी यांचे भूमिपूजनाच्या आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार, बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, मालेगाव अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, या पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक असलेला 15 टक्के निधी राज्य शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेच्या पूर्णत्वाने येथील स्थानिकांना दररोज पाणी मिळणार असून त्यांच्या आयुष्यात बदल घडविणारी ही योजना असल्याने यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. तसेच मनमाड म्हणजे राज्यातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असल्याने येथील रस्त्यांच्या विकासाकरिता निधी देण्यात येऊन बंद असलेल्या योजना सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे मनमाड नगरपरिषद इमारतीच्या दुरुस्तीसाठी 10 कोटींचा निधी दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

ते म्हणाले, नांदगाव तालुक्यातील स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी मनमाड येथे एमआयडीसी सुरू करण्याकरिता येत्या नजीकच्या काळात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. त्याचप्रमाणे फिरते दवाखाने, फिरते कार्यालये या संकल्पनाचे कौतुक करून यांच्या माध्यमातून नागरिकांच्या हिताचे काम येथे होत असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

महिलांच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न मार्गी लागणार : डॉ भारती पवार

आज करंजवण-मनमाड पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनातून महिलांच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. मुख्यमंत्र्यांनी करंजवण -मनमाड पाणी पुरवठा योजनेस तात्काळ मंजूरी दिली आहे यातून त्यांची कामाबद्दलची तत्परता गावोगावी पोहचत आहे. नांदगाव शहरात साकारत असलेली भव्य शिवसृष्टी केवळ नांदगावचा नाहीतर सर्व महाराष्ट्रातील जनतेचा ऐतिहासिक वारसा आहे. नार-पार नदीजोड प्रकल्पात नांदगाव व सटाणा तालुक्यांचा समावेश करण्याबाबत शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्यात येवून त्याबाबत मंजूरीसाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार आहे, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पाणीपुरवठामंत्री पाटील म्हणाले की, या पाणीपुरवठा योजनेमुळे महिलांच्या 50 टक्के समस्या कमी होणार आहेत. या योजने सोबतच ग्रामीण पुरवठा विभागाच्या वतीने देखील 500 कोटी रुपयांच्या पाणी योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. अशा विविध विकास कामांच्या माध्यमातून मनमाडच्या विकासात भर पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान (राज्यस्तर) योजनेअंतर्गत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मनमाड शहर व मार्गस्थ -२ गावे पाणी पुरवठा (करंजवण धरण उद्भव) योजना, शिवसृष्टी व ललवाणी उपजिल्हा रुग्णालय, मनमाड या कामांच्या कोनशिलांचे अनावरण करण्यात आले. तसेच फिरते दवाखाने व फिरते कार्यालये असलेली वाहनांचे लोकार्पण करून दिव्यांग बांधवांसाठी सायकलींचे वाटप यावेळी मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

FCIREA की वार्षिक सभा में कोयला उद्योग के पूर्व कर्मियों के दर्जनभर संगठनों ने हिस्सा लिया 

Tue Feb 14 , 2023
– विभिन्न मांगों पर हुई मंथन,उपस्थितों ने संबंधित मामलों के शीघ्र समाधान के लिए अपने-अपने विचार प्रकट किए. नागपुर – देश के कोयला खनन उद्योग से जुड़े पूर्व अधिकारी एवं कर्मचारियों की “वार्षिक आम सभा- 2023” 12 फरवरी 2023 को “फेडरेशन ऑफ कोल इंडस्ट्री रिटायर्ड एम्प्लॉईस एसोसिएशन (FCIREA)” के तत्वावधान में लैम्बन्ट आईटी पार्क, हरिहर नगर, बेसा, नागपूर में आयोजित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com