– विजेते संघ करणार उद्घाटन व समारोपीय कार्यक्रमात सादरीकरण
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात होत असलेल्या सहाव्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत शनिवारी (ता. ६) महाल येथील चिटणीस पार्क येथे प्रात्यक्षिक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.
याप्रसंगी खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर, नागपूर महानगरपालिकेचे माजी क्रीडा अधिकारी डॉ. हंबिरराव मोहिते, श्रीकांत आगलावे, माजी नगरसेवक राजेश घोडपागे, प्रदीप केचे, छत्रपती पुरस्कार्थी संदीप गवई, अनिता भोतमांगे यांच्यासह सर्व शाळांचे मुख्याध्यापक प्रामुख्याने उपस्थित होते.
१२ जानेवारी ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १२ जानेवारीला महोत्सवाचा उद्घाटन समारंभ आणि २८ जानेवारीला स्पर्धेचा समारोप होणार आहे. या दोन्ही समारंभात उपस्थित असणाऱ्या अतिथींसमोर काही प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. यादृष्टीने आज शनिवारी लेझीम, अॅरोबिक्स, झुम्बा, लोकनृत्य (फोक डान्स), गोंधळ, कथ्थक, आदिवासी व पारंपरिक नृत्य, मल्लखांब, रोप मल्लखांब (सामूहीक), मानवी मनोरे, शारीरिक कवायत, सामूहिक दंड शस्त्र प्रदर्शन, सामूहिक बँड पथक/घोष पथक (प्रात्याक्षिक), ग्रुप डान्स, ढोलताशा पथक या विविध प्रात्यक्षिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेमध्ये एकूण २० संघांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये विविध शाळांच्या संघांनी लेझिमचे उत्कृष्ठ सादरीकरण केले. नवयुग प्राथमिक शाळा राजाबक्षा येथील चिमुकल्यांच्या ढोलताशा पथकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. नागपूर जिल्हा मलखांब असोसिएशनच्या खेळाडूंनी मलखांबची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. स्पर्धेमध्ये ८ आखाड्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये गुमगाव येथील एका आखाडा संघाने देखील सहभाग नोंदविला होता.
डॉ. राजरत्न दुर्गे, डॉ. सुनील घुलाक्षे आणि डॉ. सुरेखा धात्रक यांनी परीक्षकांची जबाबदारी पार पाडली. खासदार क्रीडा महोत्सव समितीद्वारे लवकरच स्पर्धेचा निकाल जाहिर केला जाईल व विजेत्या संघांना पारीतोषिक प्रदान करण्यात येतील.
उद्घाटन कार्यक्रमामध्ये खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव तथा छत्रपती पुरस्कार्थी डॉ. पीयूष आंबुलकर, छत्रपती पुरस्कार्थी संदीप गवई आणि छत्रपती पुरस्कार्थी अनिता भोतमांगे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.