अमरावतीत अज्ञात रोगामुळे हजाराहून अधिक मेंढ्यांचा मृत्यू; राज्यसरकारने तातडीने पाऊले उचलावीत – अजित पवार

मुंबई – अमरावती जिल्ह्यातील काळाखडक व जनुना येथील मेंढपाळांच्या एक हजाराहून अधिक मेंढ्यांचा अज्ञात रोगामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मात्र मेंढ्यांचे मृत्यू नेमक्या कोणत्या रोगामुळे होत आहेत, याबाबत अजूनही तेथील पशुसंवर्धन विभागाने जाहीर केलेले नाही, या रोगाचा इतर मेंढ्यांमध्ये प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तेथे कोणतीही खबरदारीची उपाययोजना राबविण्यात आलेली नाही, याकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गत विधानसभेच्या सभागृहाचे लक्ष वेधले.

दरम्यान मेंढ्यांमध्ये उद्भवणाऱ्या या संसर्गजन्य आजारावर तातडीने उपाययोजना करुन मेंढपाळांना दिलासा देण्याची मागणी अजित पवार यांनी यावेळी केली.

अमरावती जिल्ह्यातील काळाखडक आणि जनुना येथे गेल्या काही दिवसापासून अज्ञात रोगामुळे मेंढपाळांच्या एक हजाराहून अधिक मेंढ्या मृत्यूमुखी पडल्‍या आहेत. मेंढ्यांच्या तोंडाला फोड येणे, अंगात ताप येणे, पायाला जखम होणे अशी लक्षणे दिसत आहेत. अशा प्रकारची लक्षणे ब्लू टंग, पायरेकझिया, तांडखुरी-पायखुरी किंवा प्लुरो न्यूमोनिया या चार आजारात दिसतात. मात्र अजूनही पशुसंवंर्धन विभागाकडून या ठिकाणी मृत होत असलेल्या मेंढ्या नेमक्या कोणत्या रोगाची शिकार आहेत. हे जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे आजारी मेंढ्यांवर अंदाजे उपचार करण्यात येत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे. या रोगाचा प्रसार अत्यंत वेगाने होत असून रोगाची लक्षणे दिसल्यानंतर अवघ्या तीन दिवसात मेंढ्यांचा मृत्यू होत आहे. हा रोग इतर मेंढ्यांच्यात फैलावू नये म्हणून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून लसीकरणाची कोणतीही मोहीम राबवण्यात आलेली नाही असेही अजित पवार म्हणाले.

अमरावती जिल्ह्यातल्या काळा खडक आणि जनुना येथे मेंढपाळांची मोठी संख्या आहे. या मेंढपाळांच्याकडे एकूण तीस हजारांच्यावर मेंढ्या आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने मेंढ्या असतानाही या परिसरात कायमस्वरुपाचा पशुवैद्यकीय दवाखान्याची सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील मेंढपाळांना अनेक समस्यांना सामोरं जावे लागत आहे. या घटनेची सरकारने गंभीर दखल घेऊन तातडीने पाऊले उचलण्याची मागणी अजित पवार यांनी यावेळी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

महानिर्मितीच्या कोराडी आणि खापरखेडा वीज केंद्रात १२ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना “संशोधन सहाय्यक” म्हणून संधी..

Tue Aug 23 , 2022
महानिर्मिती राज्यभर ६० संशोधन सहाय्यकांना सहभागी करणार  व्ही.एन.आय.टी.नागपूर आणि महानिर्मिती यांच्यात सामंजस्य करार  पदव्युत्तर, पदवी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना संशोधनासह अर्थार्जनाची सुवर्ण संधी नागपूर  : स्पेशलायझेशनच्या युगात नवनवीन संशोधने आणि सुधारणांना नेहमीच वाव असतो. वीज उत्पादनाच्या खडतर आणि अतिशय गुंतागुंतीच्या तांत्रिक स्वरूपाच्या कामात दैनंदिन समस्यांवर मात करण्यासाठी महानिर्मितीच्या २१९० मेगावाट क्षमतेच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्र आणि १३४० मेगावाट क्षमतेच्या खापरखेडा औष्णिक विद्युत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com